पृथ्वी शॉसारखा कोणीही नाही – आकाश चोप्रा

नवी दिल्ली – श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ज्या पद्धतीने पृथ्वी शॉ याने आक्रमक खेळी केली त्यामुळे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. 

सध्याच्या फलंदाजांबाबत बोलायचे तर पृथ्वी याच्यासारखी गुणवत्ता असलेला नवोदित क्रिकेटपटू कोणत्याही संघात नाही, इतकेच काय सध्याच्या भारतीय संघातही त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, असे मत चोप्रा यांनी व्यक्‍त केले आहे.

श्रीलंकेने पहिल्या सामन्यात भारताच्या गोलंदाजीचा चांगला सामना करत आव्हानात्मक धावसंख्या उभारली तेव्हा असे वाटले की या धावांचा पाठलाग कठीण असेल. मात्र, भारतीय फलंदाजी सुरू झाली आणि पृथ्वीने श्रीलंकेच्या गोलंदाजीवर सुरू केलेले आक्रमण पाहिल्यावर हा सामना 25 ते 30 षटकांतच संपेल असा विश्‍वास आला. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करत होता ते पाहता त्याला शतकाची संधी होती. मात्र, त्याचे शॉट सिलेक्‍शन चुकले व तो बाद झाला. स्वतःच्या बाद होण्यावरही तो निराश झाला असेल कारण अशा खेळी नेहमी होत नशाहबीत, असेही ते म्हणाले.

मी पृथ्वी शॉचा मोठा चाहता आहे कारण त्याच्यासारखा फलंदाज शोधूनही सापडणार नाही. पृथ्वीने विजय हजारे करंडक आणि आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात जशी फलंदाजी केली तशीच श्रीलंकेविरुद्ध केली. वीरेंद्र सेहवाग अशी फलंदाजी करायचा. आज पृथ्वीची फलंदाजी पाहिली की सेहवागचीच आठवण येते. यंदाच्या मोसमात पृथ्वीने विजय हजारे स्पर्धेत विक्रमी 827 धावा केल्या आहेत. यातच त्याचा फॉर्म सिद्ध होतो. श्रीलंका दौऱ्यातील कामगिरीच त्याला प्रमुख संघात स्थान मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरणार आहे आणि हे त्यालाही माहिती असेल, असेही चोप्रा म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.