मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित माहीममधून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मुंबईतील तो मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. अशात माहीममध्ये प्रचाराची गरज नाही, अशा आशयाचे वक्तव्य करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर्क-वितर्कांना आणखीच खतपाणी घातले आहे. अमित ठाकरे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरल्याने माहीममधील लढत लक्षवेधी बनली आहे.
त्या मतदारसंघात शिंदेसेनेने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, ठाकरेसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होत आहे. त्या मतदारसंघात उद्धव किंवा त्यांचे पुत्र आदित्य प्रचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ठाकरेसेनेचा अमित यांना छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
त्या पार्श्वभूमीवर, माहीममध्ये प्रचारसभा घेण्याविषयीचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उद्धव उत्तरले, माहीम हा माझा मतदारसंघ आहे. तो शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिथे सभा घेण्याची आवश्यकता नाही. माझा मुंबईकरांवर आणि मुंबईकरांचाही माझ्यावर विश्वास आहे. महाराष्ट्राचाही माझ्यावर विश्वास आहे.
एका ठिकाणी गेलो आणि दुसऱ्या ठिकाणी गेलो नाही; म्हणजे मी एकीकडे लक्ष देतोय अन् दुसरीकडे दुर्लक्ष करतोय असा अर्थ होत नाही. दिवसाला ४-५ सभा घेतल्या तरी सर्व मतदारसंघांमध्ये जाता येऊ शकणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.