मतदानाच्या सुट्टीचा संभ्रम आदेशात तारखेचा उल्लेखच नाही

मावळ आणि शिरुरच्या मतदानादिवशी सुट्टी नाही?

पिंपरी  –
समाजातील सर्व वर्गाला आपल्या मतदानाचा हक्‍क बजावता यावा म्हणून संबधित जिल्ह्यात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक आधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. असे असताना पुणे जिल्ह्यातील शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मात्र संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 4 लोकसभा मतदारसंघापैकी पुणे आणि बारामतीसाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मावळ आणि शिरुर या दोन मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मावळ आणि शिरुर मतदारसंघात मतदान असणाऱ्यांना सुट्टी कोणत्या दिवशी आहे याचा संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशातही संबंधित जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहिल असा उल्लेख आहे. त्यामुळे, अनेक कंपन्यांनी 23 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर केली आहे. 29 एप्रिल रोजी मात्र कामकाज सुरुच राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील नोकरदार वर्ग सुट्टी नसल्याने मतदानापासून मुकण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत यावेळी नोकरदार वर्गासाठी वेगळाच पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. चार मतदारसंघ असलेल्या जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे, काही कंपन्यांनी मतदानासाठी 23 एप्रिल रोजी सुट्टी दिली आहे. त्यामुळे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात नावे असलेल्या मतदारांची मोठी अडचण निर्माण झाली असून मतदानासाठी त्यांना धावपळ करावी लागणार आहे. पुणे शहरालगत असलेल्या हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत.

या कंपन्यांमध्ये लाखो कर्मचारी काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये राहत आहेत. तर काही जण पुणे शहरात वास्तव्यास आहेत. औद्योगिक कंपन्यामधील कामागारांचीही हीच परिस्थिती आहे. अशा स्थितीत बहुतांश कंपन्यानी मतदानासाठी कर्मचाऱ्यांना 23 एप्रिलची सुट्टी जाहीर केली आहे. कंपन्याच्या या निर्णयामुळे पुणे शहरातील कर्मचाऱ्यांची सोय झाली आहे. मात्र, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात नावे असलेल्या कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. या कर्मचाऱ्यांना आता आपले काम संभाळत मतदानचा हक्क बजावावा लागणार असल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडणार आहे.

वास्तविक निवडणूक विभागाने जो आदेश काढला आहे. त्यामध्ये संबंधित जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील असे नमूद करण्यात आले आहे. यानुसार सरकारी कार्यालये, निमसरकारी कार्यालये, बॅंका बंद राहणार आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात दोन वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होत असल्याने दोन सुट्ट्या मिळणार की, एक सुट्टी याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण पहायला मिळत आहे.

कंपन्यांचा तीन तासांचा फॉर्म्युला

बहुतेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय पुण्यात असल्याने कित्येक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी उपाय शोधला आहे. आदेशानुसार 23 एप्रिलची सुट्टी घोषित करतण्यात आली आहे. तर जे कर्मचारी शिरुर आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे मतदार आहेत, त्यांना तीन तासांची सुट्टी किंवा हाफ डे देण्यात येणार आहे. एक तर त्यांनी मतदान करुन तीन तास उशिरा कार्यालयात यायचे किंवा तीन तास लवकर जाऊन मतदान करता येऊ शकेल. कंपन्यांच्या या तीन तासांच्या फॉर्म्युल्याविषयी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असली तरी कंपन्या मात्र ठाम आणि कर्मचाऱ्यांनी मतदानच करावे आणि त्यासाठीच तीन तासांची किंवा “हाफ डे’ची सुविधा घ्यावी, याबाबत ठाम आहेत.

29 एप्रिल रोजी सोमवार आहे, त्याआधी शनिवार-रविवार अशा दोन सुट्ट्या आहेत. सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्यामुळे कर्मचारी बाहेरगावी फिरायला जाऊ शकतात आणि मतदान हा मुख्य उद्देश पूर्ण होणार नाही, अशीही भीती व्यक्‍त केली जात आहे. कंपन्यांनी 23 एपिलला सुट्टी जाहीर केलेलीच आहे परंतु 29 एप्रिललाही मतदार कर्मचाऱ्यांसाठी सवलत देण्यात येत आहे. याबाबत कंपन्यांचे अधिकारी सांगतात की, सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान करावे, याबाबत कंपन्या आग्रही आहेत, त्यामुळे 23 एप्रिलला पूर्ण दिवस सुट्‌टी तर 29 एप्रिलला फक्‍त मावळ व शिरुरच्या मतदारांसाठी काही कंपन्या तीन तासाची तर काही कंपन्या “हाफ डे’ची सवलत देत आहेत. परंतु मतदान करणाऱ्या मतदारांनांच ही सवलत दिली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)