आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी नामंजूर केल्याने विरोधक नाराज
पिंपरी – महाविकास आघाडी सरकारच्या वतीने नुकताच अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासाठी चांगली तरतूद केल्याचे सांगत महासभेमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. मात्र भाजपने तो मंजूर केला नाही. यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये परिपक्वता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी बुधवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत केला.
यावेळी मिसाळ म्हणाले, महाविकास आघाडीच्या वतीने राज्याचे वित्तमंत्री व पुणे जिल्हाचे पालक मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये शहराच्या दृष्टीने पुणे – नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे कामास मान्यता, पुण्याबाहेरून अंदाजे 26 हजार कोटी रुपयांचा 170 किलोमीटर लांबीच्या चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, पिंपरी ते भक्ती शक्ती मेट्रो प्रकल्पास मान्यता दिली.
या लोकहिताच्या योजना अर्थसंकल्पात मांडल्याबद्दल राष्ट्रवादी व शिवसेना पक्षामार्फत मंगळवारी झालेल्या फेब्रुवारी महिन्याच्या महापालिका सभेमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजित पवार तसेच महाविकास आघाडीचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला होता. परंतु सत्ताधारी भाजपने त्याला विरोध दर्शवित अभिनंदन ठराव मंजूर केला नाही व आपला कोतेपणा दाखवून दिला.
आम्ही पक्षीय राजकारण केले नाही
यापूर्वी केंद्राकडून 370 कलम हटविण्याबाबत कायदा समंत केला. तेव्हा तत्कालीन सभागृहनेते एकनाथ पवार यांनी महापालिका सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. त्यावेळी आम्ही मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन केले होते. आम्ही यात कुठलेही राजकारण केले नाही. जी चांगली गोष्ट झाली तिला आम्ही पाठिंबा दिला यात पक्षीय राजकारण केले नाही. परंतु भाजपचे पदाधिकारी आणि एकनाथ पवार यांनी कालच्या महाविकास आघाडीच्या अभिनंदनाच्या ठरावाला विरोध करुन पक्षीय राजकारण केले. तसेच त्यांची राजकीय अपरिपक्वता दाखवून दिली, असल्याचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ योंनी सांगितले.