“कॉंग्रेस मध्ये नेतृत्वाचा कोणताच वाद नाही”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल आणि अधिररंजन चौधरी यांच्यात मध्यंतरी तुतुमैमै झाल्याचे उघड झाले असले तरी कॉंग्रेस मध्ये नेतृत्वाचा कोणताच वाद नाही असे ज्येष्ट कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच पक्षात पुर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस मध्ये असलेले अंतर्गत नाराजी उफाळून आली होती पण त्याचा खुर्शिद यांनी इन्कार केला आहे.

आज पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की पक्षाच्या धोरणाच्या संबंधात आपली नाराजी किंवा वेगळा अभिप्राय व्यक्त करायचा असेल तर कॉंग्रेस मध्ये त्यासाठी अनेक व्यासपीठे उपलब्ध आहेत. त्या त्या व्यासपीठांवर व्यक्त झालेल्या मतांबद्दल पक्षाचे नेतृत्व आपली भूमिका स्पष्ट करीत असते. असे असताना पक्षाचे नेतृत्व आमचे ऐकत नाहीं असे कोण कशासाठी म्हणते हे कळत नाहीं असे ते म्हणाले.

बिहार मध्ये पक्षाचा जो पराभव झाला त्याविषयी कपिल सिब्बल आणि पी चिदंबरम यांनी व्यक्त केलेल्या मतांविषयी विचारले असता खुर्शिद म्हणाले की, बिहारच्या निकालाबाबत या दोन्ही नेत्यांनी जी मते व्यक्त केली आहेत ती अयोग्य नाहीत, त्या मतांशी आम्हीही सहमत आहोत. पण या बाबतीत प्रत्येकाने माध्यमांकडे जाऊन कॉंग्रेसने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे असे सांगण्याची गरज नाही अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

पक्षात प्रत्येक निवडणुकीचे विश्‍लेषण होते. त्याविषयी कोणाच्याही मनात राग नसतो. बिहारचेही विश्‍लेषण केले जाईल. तेथ जे काही चुकीचे घडले असेल त्याची दखल पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर घेतली जाते. पण त्याविषयी आम्ही माध्यमांमध्ये बोलत नाही असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.