पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाजप नेते गिरीश बापट असताना पहिल्या यादीतच कसबा विधानसभा मतदार संघातील उमेदवाराचे नाव पहिल्याच यादीत झळकायचे. मात्र, आता अनेक इच्छुकांमुळे कसबा “अॉप्शन’ला टाकण्यात आला आहे.
तेथील उमेदवाराची घोषणा झाली नाही. याशिवाय खडकवासला आणि पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातही भाजपचे विद्यमान आमदार असताना त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने विद्यमानांमध्ये धाकधूक वाढली आहे.
खडकवासला मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आहेत. तेथील उमेदवारीची घोषणा पहिल्या यादीत झाली नाही.
तर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातही सुनील कांबळे हे भाजपचेच विद्यमान आमदार असतानाही तेथेही तशीच स्थिती आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपला जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यामध्ये लढत झाली होती.
त्यात कसबा भाजपच्या हातातून निसटला. त्यानंतर धंगेकर यांनी लोकसभाही लढवली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र आता धंगेकर यांच्या विरोधात कोणता चेहरा देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
येथून इच्छुक असलेले भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी “ब्राह्मण कार्ड’ बाहेर काढले असले, तरी रासने आणि घाटे सोडून अचानक कोणते नाव पुढे येईल ? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हडपसरची जागा कोणाला?
हडपसर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार चेतन तुपे हे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे ह मतदार संघ कोणाला जातो. भाजप संपूर्ण पुण्याचा कारभार स्वत:कडे ठेवतो की, दादा गटालाही देतो, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
वडगावशेरी भाजपच्या पारड्यात पडणार का?
वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत आणि ते अजित पवार समर्थक आहेत.
त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीच्या हिश्श्यात अजित पवार गटाला जातो की, या जागेबाबत तडजोड होऊन ही जागा भाजपला आणि शिरूरची भाजपची जागा अजित पवार गटाला दिली जाते, याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.