म्युच्युअल फंडाबाबत बाजार नियंत्रकांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – कोणतीही गुंतवणूक ही गुंतवणूकदारांचे हित जोपासणारी असली पाहिजे. त्यामुळे स्मॉलकॅपमध्ये म्युच्युअल फंडानी गुंतवणूक करावी, असा सेबीचा आग्रह नाही असे बाजार नियंत्रक सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी म्हटले आहे.
मात्र, म्युच्युअल फंड जर मल्टीकॅप योजना जाहीर करीत असतील तर त्यांनी आपल्या नावाप्रमाणे विविध विभागांत गुंतवणूक करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मल्टीकॅप योजनातील किमान 25 टक्के गुंतवणूक लार्ज, मिड आणि स्मॉलकॅपमध्ये असली पाहिजे, असे सेबीने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते. त्यानंतर लार्जकॅपमधील 30 ते 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक इतरत्र जाण्याची शक्यता म्युच्युअल फंडांनी व्यक्त केली होती.
यावर त्यागी म्हणाले की, अगोदर म्युच्युअल फंडांकडून मल्टीकॅप योजना फारशा जाहीर होत नव्हत्या. त्यामुळे आता मल्टीकॅप योजनांनी खरोखरच विविध कॅपमध्ये गुंतवणूक करावी अशी आमची अपेक्षा आहे. मल्टीकॅप योजना असताना केवळ एकाच कॅपमध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास होऊ शकतो. त्यासाठी आपण हे स्पष्टीकरण करीत आहोत, असे ते म्हणाले.
यासंदर्भात म्युच्युअल फंडाच्या संघटनेने आमच्याकडे निवेदन दिले आहे. त्या निवेदनाचा अभ्यास करून आम्ही याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले. बाजारात सध्या अनिश्चित वातावरण असल्यामुळे आमचे शेअरबाजारातील कामकाजाकडे बारीक लक्ष आहे, असे ते म्हणाले.
शेअर निर्देशांकांची घसरण चालूच
अगोदरच जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असताना करोना संसर्गाचे प्रमाण वाढून अनेक देशांत लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे जागतिक शेअरबाजारात विक्री चालूच आहे. त्यामुळे कालच्याप्रमाणे आजही शेअरबाजार निर्देशांक घसरले. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी म्हणजे 0.80 टक्क्यांनी कमी होऊन 37,734 बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 96अंकांनी कमी होऊन 11,153 अंकांवर बंद झाला. आनंद राठी या संस्थेचे संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर विक्री चालू असताना भारतीय शेअरबाजार त्यापासून अलिप्त राहणे शक्य नाही.