वॉशिंग्टन: अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा आपला इरादा नाही, अशी पलटी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली आहे. या आधी त्यांनी ही निवडणूक पुढे ढकलण्याची गरज व्यक्त केली होती, पण त्यांच्या या प्रस्तावावर चौफेर टीका सुरू झाल्यानंतर त्यांनी आता घुमजाव केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की निवडणूक पुढे ढकलण्याचा माझा इरादा नाही पण मेलवरून आलेल्या मतांची मोजणी करण्यास काही आठवडे लागू शकतात ही स्थिती टाळण्याची गरज आहे. नियोजित कार्यक्रमानुसार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्ष ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांचा तगडा मुकाबला आहे.
जनमत चाचण्यांमध्ये बिडेन हे ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. त्यातच त्यांनी निवडणुका पुढे ढकलण्याचा इरादा व्यक्त केल्याने त्यांनी पराभवच मान्य केल्याचा प्रसार विरोधी आघाडीकडून सुरू आहे. मेलवरून येणाऱ्या मतांमध्ये गफला होण्याची शक्यता असल्याने आणि ती मते मोजण्यात काही आठवडे लागण्याची शक्यता असल्याने ही निवडणूकच तात्पुरती पुढे ढकलली पाहिजे, असे मत त्यांनी गुरुवारी व्यक्त केले होते. पण आज त्यावर ते म्हणाले की, मला निवडणूक पुढे ढकलायची नाही, मला ती नियोजित वेळेतच घ्यायची आहे पण त्याच वेळी मेलवरून आलेल्या मतांच्या मोजणीसाठी तीन-तीन महिन्यांचा कालावधीही मला लागू द्यायचा नाही.
मेलद्वारे मतदान हा घोटाळ्याचाच मामला आहे. अमेरिकेसाठी ती लाजिरवाणी बाब ठरू शकते. लोकांना सुरक्षितपणे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी आधी मांडली होती.
आजही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना निवडणूक पुढे ढकलण्याचा आपला इरादा नाही हे स्पष्ट करतानाही मेल वरून मतदान करण्याच्या प्रकाराविरोधात आपला रोष प्रकट केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मेलद्वारे मतदान करण्याचा अधिकार लोकांना दिला जाणार आहे. त्यात मोठा घोळ होऊ शकतो असा त्यांचा दावा आहे.