सक्रिय बाधितांचा “हिशेब’ जुळवण्याचा आटापिटा
पुणे – करोनाची लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेल्यांना घरीच विलगीकरण केले जात आहे. मात्र, या बाधितांचा विलगीकरण कालावधी संपल्यानंतर सक्रिय बाधितांच्या आकडेवारीतून त्यांचे नावच वगळले जात नसल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे सक्रीय बाधितांचा आकडा हिशेबच लागत नसल्याचे प्रकरणदेखील यातून समोर आले आहे. आता ही आकडेवारी जुळवण्यासाठी नवी
आकडे”मोड’ केली जाणार आहे.
करोनावर घरातच राहून उपचार घेणाऱ्यांची यादी जुळवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक केली आहे. या माहिती संकलनासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील सक्रीय बाधितांचा आकडा कमी होऊन शहरात नेमके किती बाधितांवर उपचार सुरू आहेत, याचा नेमका आकडा समोर येणार आहे, असा दावा केला जात आहे.
देशभरात करोनाबाधितांचा आकडा वाढल्याने यंत्रणेवर ताण वाढत आहे. रुग्णालयांत खाटाही कमी पडत आहेत. यावर लक्षणे नसलेल्या तसेच सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधितांना घरीच विलगीकरणात ठेवण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जुलैच्या सुरूवातीपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, ज्यांना खासगी रुग्णालये घरी विलगीकरणासाठी पाठवत आहेत, दहा दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे बाधित बरे झाल्याची कोणतीही नोंद ठेवली जात नाही, तसेच पालिकेसही कळवत नाहीत.
त्यामुळे शहरातील सक्रीय बाधितांचा आकडा अचानक वाढला आहे. ही बाब समोर आल्यानंतर महापालिकेने तातडीने या नोंदींचा गोंधळ मिटवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांची नियुक्ती करण्यात आली असून, मागील तीन दिवसांपासून करोनावर उपचार करणाऱ्या सर्व रुग्णालयांकडून बाधित, विलगीकरणात ठेवलेले तसेच दहा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या बाधितांचा आकडा संकलित करण्यात येत आहे. आता या “हिशेब जुळणी’नंतर सक्रीय बाधितांचा हिशेब लागणार आहे.
46% बाधित “होम क्वारंटाइन’
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, 26 जुलैपर्यंत शहरात 18,298 सक्रिय करोना बाधित होते. त्यातील सुमारे 8 हजार 394 जण घरीच विलगीकरणात आहेत. हा आकडा एकूण बाधितांच्या सुमारे 46 टक्के आहे. तर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये सुमारे 6 हजार, खासगी तसेच शासकीय रुग्णालयांत सुमारे 4 हजार जणांवर उपचार सुरू आहेत.