नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कुठली सुधारणा झालेली नाही. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना येथील लष्करी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
प्रणवदांना 10 ऑगस्टला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याआधी झालेल्या चाचणीत ते करोना पॉझिटिव्ह आढळले. रूग्णालयात दाखल केल्याच्या पुढील दिवशी प्रणवदांची प्रकृती ढासळली. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक देखरेख ठेऊन आहे.
दरम्यान, प्रणवदा यांच्या कन्या असणाऱ्या कॉंग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडील लवकर बरे व्हावेत अशी ईश्वराला प्रार्थना केली. ईश्वर त्यांच्यासाठी सर्व काही चांगले करेल, अशी भावना शर्मिष्ठा यांनी ट्विटरवरून व्यक्त केली. प्रणवदांसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्वांचे आभारही त्यांनी मानले.