“वीज क्षेत्रातील अपयश झाकण्यासाठीच दरवाढ’

पुणे – वीजगळती आणि वीजचोरी रोखण्यास महावितरण प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे वीज क्षेत्रातील अपयश झाकण्यासाठीच महावितरण प्रशासनाने राज्य वीज नियामक आयोग आणि राज्य शासनाच्या मदतीने राज्यभरातील सर्वसामान्य ग्राहकांवर वीज दरवाढ लादली आहे, असा आरोप राज्य वीज ग्राहक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी केला आहे. या वीज दरवाढीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यासंदर्भात होगाडे यांनी पत्रक प्रसिध्दिस दिले आहे, या पत्रकाद्वारे त्यांनी हा आरोप केला आहे. या पत्रकात होगाडे यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य ग्राहकांवर प्रति युनिट पंधरा पैसे वीज दरवाढ लादताना प्रशासनाने इंधन समायोजन आकाराच्या नावाखालीही मागच्या दाराने वीज दरवाढ लादली आहे. वास्तविक राज्यातील वीज गळती आणि वीज चोरीचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. मात्र, ही गळती अथवा वीजचोरी रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळेच या वीजचोरांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वीजचोरी आणि गळती रोखल्यास वीजेची दरवाढ करण्याची कोणतीही गरज भासणार नाही, हीच बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडू असा इशाराही होगाडे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.