अर्थवेध: नव्या बदलांना दोष नव्हे, दिशा देण्याची गरज

यमाजी मालकर

मानवी जीवनाचा वेग वाढविणारे, त्याचे श्रम कमी करणारे आणि व्यापारउदीम म्हणूनच पुढे जाणारे बदल जगाचे सपाटीकरण करत आहेत, असे म्हटले जाते. पण या बदलांना कोणीच नाकारू शकत नसल्याने आणि जगातील या शतकातील प्रचंड सरमिसळ लक्षात घेतल्यास त्या बदलांना विधायक म्हणजे “वसुधैव कुटुंबकम’ ची दिशा देण्याचे काम जगातील सुजाण नागरिकांना करावे लागणार आहे.

आजच्या जगात होणारे बदल चांगले आहे की वाईट, अशी चर्चा होताना अनेकदा आपण पाहतो. पण ती चर्चा निष्कर्षापर्यंत जात नाही. अशा या बदलांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कारण त्या बदलांचे वैशिष्ट्यं म्हणजे ते सर्वत्र सारखे आहेत. केवळ आजूबाजूलाच नव्हे तर जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या बदलांचा कानोसा घेतला तरी आपल्याला जाणवणारे बदल त्या टोकावरही जाणवत आहेत, असे लक्षात येते. हे बदल सुरुवातीला काहींना जाचक वाटतात; पण त्याशिवाय पर्याय नाही, म्हणून प्रवाहात स्वीकारले जातात. हे बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान आणि कंपन्या सुरुवातीला आपल्या परिचयातील नाहीत किंवा आपल्या देशातीलही नाहीत, असेही लक्षात येते; पण म्हणून ते बदल थांबत नाहीत. काही लोक याला जगाचे वैविध्य घालविणारे सपाटीकरण होते आहे, असे म्हणतात आणि तसे व्हायला नको, असेही सांगतात. पण या बदलांची उपयोगिता आणि वेग इतका प्रचंड आहे की कोण काय म्हणतो, याची वाट न पाहता ते समाजाने स्वीकारलेले असतात.

असा सर्वात मोठा बदल होता, तो 1991 मध्ये झालेल्या जागतिकीकरणाचा. म्हणजे त्यावर्षी आपण जागतिकीकरणाचा वेग वाढविला. कारण जागतिकीकरण तर आपण पूर्वीच स्वीकारले होते. त्याचा वेग वाढण्यासाठी आपल्याला आपल्या देशाची बाजारपेठ जगाला खुली करावी लागली. आपल्या तिजोरीतील डॉलर संपल्याने आपण अत्यावश्‍यक अशा तेलाचीही आयात करू शकत नव्हतो. मग आपले सोने आपण गहाण ठेवले आणि जागतिकीकरणाचा स्वीकार करणाऱ्या अनेक करारांवर सह्या केल्या.

आता 27 वर्षे मागे वळून पाहिले की लक्षात येते की त्यावर कितीही उलट-सुलट चर्चा झाली असली तरी त्याच्या अपरिहार्यतेचा स्वीकार करून आपल्या देशाने त्याचा फायदा करून घेतला. एका संकटाचे आपण संधीत रूपांतर केले, याविषयी बहुतेकांचे आज एकमत आहे. केवळ सरकारी भांडवल गुंतवणुकीवर एवढा मोठा देश चालू शकत नाही. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढली पाहिजे, अगदी परकीय गुंतवणूकही वाढली पाहिजे यावर परस्परविरोधी राजकीय पक्षांचेही एकमत झाले, यातच सर्वकाही आले.

असा हा मोठा बदल देशाने स्वीकारला म्हणजेच देशातील नागरिकांनी स्वीकारला. या बदलाचे सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या आयुष्यावर होणारे परिणाम सहजपणे लक्षात येत नव्हते. गेल्या तीन दशकांत हा बदल सर्वव्यापी झाला असून इंटरनेट, डिजिटल व्यवहार आणि स्मार्ट फोनने त्याला अशी गती दिली की तरुण पिढी आता त्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की, ही पिढी हे बदल घेऊन नव्हे, त्याच्या वाढत्या वेगावर स्वार होऊनच पुढे जाणार आहे आणि जे समूह तो स्वीकारणार नाही, त्यांची कोंडी होणार आहे. या बदलांचे वैशिष्ट्य म्हणजे देश, धर्म, प्रदेश, विचारसरणी वेगळी असणारे हे बदल सारख्याच पद्धतीने स्वीकारत असतात. पडलाच फरक तर वेगाचा पडू शकतो. चीन कम्युनिस्ट देश आहे म्हणून भांडवलशाही देशांतून येणाऱ्या परकीय चलनाला तो नाही म्हणत नाही.

इस्लाम धर्मात व्याज घेणे चांगले मानत नाहीत म्हणून त्यांना बॅंकिंग टाळता येत नाही किंवा इस्लाममध्ये श्रम न करता केलेल्या कमाईला चांगले मानत नाहीत, म्हणून पाकिस्तानातील शेअर बाजार बंद पडत नाही. उलट इमर्जिंग मार्केटमध्ये त्याचा कसा समावेश होईल, अशी धडपड त्यांना करावी लागते. चलनाची घसरण झाल्यामुळे आपल्याला प्रवास परवडला पाहिजे म्हणून इस्लामाबादचे तरुण तंत्रज्ञ पुढे येऊन शेअर कारचे ऍप विकसित करतात. भारतातील निवडणुकीत भांडवलशाहीला विरोध करणारे पक्ष आणि कार्यकर्ते भांडवलशाहीत जन्म झालेल्या फेसबुक, व्हाट्‌सऍप, गुगलचा उपयोग करणार नाही, असे म्हणू शकत नाहीत. सर्व देशांत रस्त्यावरची चिन्हे सर्वांना कळली पाहिजेत, विमानातील सूचना जगभर सारख्या असल्या पाहिजेत, आपल्याही शहरांत मेट्रोने प्रवास करता आला पाहिजे, असे सर्वांनाच वाटू लागते.

जगातील सर्व भाषांत संगणकावर लिहिता आले पाहिजे, हे गुगल आणि मायक्रोसॉफ्ट व्यवसाय म्हणून विकसित करत असले तरी त्याचा स्वीकार केवळ अपरिहार्यच नव्हे तर आयुष्य सोपे करणारा आहे, याविषयी एकमत होते. जगात सर्वांनी फोनचा वापर वाढवावा, इतकी त्याची सिस्टीम सोपी केलेली असते आणि त्याचा वापर करून जीवनाचा वेग नको तेवढा वाढतो, हे लक्षात येत असतानाच नाही नाही म्हणणारे एक दिवस स्मार्ट फोनच्या प्रेमात पडतात. एखादे कौशल्य स्वीकारण्यापुरतेच हे राहात नाही तर चीनसारख्या साम्यवादी देशातील नागरिकांना युरोप अमेरिकेचे प्रचंड आकर्षण निर्माण होते आणि त्या देशांतल्या इमारतींचेच नव्हे तर शहरांची प्रतीके त्यांना हवीहवीशी वाटतात. अमेरिकेतील अध्यक्षीय निवास व्हाईट हाऊससारखी नावे चीन आणि भारतातील शहरांत दिसू लागतात. चीनच्या प्रसिद्ध हुआई कंपनीने चीनमध्ये असे एक शहर उभे केले, जे युरोपातील शहरांसारखे भासते, एवढेच नव्हे तर त्यातील उपभागांना युरोपीय शहरांची नावे दिली आहेत! अशा या सर्व बदलांना आपण सपाटीकरण म्हणू शकतो. पण त्याला आज रोखले जात नाही, त्यामुळे त्याची कारणे समजून घेतली पाहिजेत.

दीड महिन्यापूर्वी इथोपियन एअरलाईन्सच्या विमानाला झालेला अपघात आठवून पाहा. या विमानातील 150 प्रवाशांत तब्बल 35 देशांचे नागरिक होते! जगात कधीही चर्चेत नसलेल्या भागात हा अपघात झाला, पण त्यात जगातील सर्व प्रमुख देशांचे नागरिक होते. जगात या शतकात जी प्रचंड सरमिसळ झाली आहे, तिचे अर्थ आता समजून घेतले पाहिजेत, असे हा अपघात सांगतो. त्यापाठोपाठ शांत समजल्या जाणाऱ्या न्युझीलंडमध्ये अतिरेकी हल्ला झाला. याचा अर्थ माणूस केवळ प्रगत देशांत सुरक्षित असून चालणार नाही, तो सर्व देशांत सुरक्षित असला पाहिजे. अनेक देशांत राष्ट्रवादाला अजूनही खतपाणी घातले जात असले तरी देशांच्या सीमा पुसट होऊ लागल्या आहेत. कारण काही प्रश्‍न असे आहेत, जे एखाद्या देशापुरते वाटत असले तरी त्याचे उत्तर मात्र जगानेच शोधले पाहिजे, अशी गरज निर्माण झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग, दहशतवाद, बेरोजगारी हे सर्व जगाने सोडवावे असे प्रश्‍न आहेत.

तात्पर्य, या बदलांनी पहिल्या टप्प्यात सपाटीकरण होते आहे, असे वाटत असले आणि ते खरे असले तरी जे बदल सोयीचे, मानवी श्रम कमी करणारे आणि मानवी आयुष्याची प्रतिष्ठा वाढविणारे आहेत, त्यांचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. कारण यातून आज व्यापारउदीम म्हणून जग एक होते असले तरी पुढील टप्पा हा या एकत्र येण्याला विधायक दिशा देण्याचा आहे. ती दिशा म्हणजे देशादेशातील चलनातील तफावत कमी करणे, देशांतील प्रवेशांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने काढून टाकणे, यंत्रांनी राक्षसी उत्पादन होते आहे, तेथे आणि जेथे रोजगारांची गरज आहे, अशा ठिकाणी कामाचे तास आठऐवजी सहा करणे, माणसाचे उत्तरायुष्य आनंदी आणि समाधानी करण्यासाठी जेष्ठ नागरिकांना जगाच्या संपत्तीचा दर्जा देऊन त्यांची मानवी स्पर्धेतून सुटका करणे. आज सपाटीकरण होते आहे, असे वाटणाऱ्या या बदलांना ही दिशा देण्याचे काम आता जगातील सुजाण नागरिकांना करावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.