राज्यात प्लॅस्टिकबंदीला मुदतवाढ नाही – पर्यावरण मंत्र्यांनी ठणकावले

मुंबई (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरणावर होणाऱ्या प्लॅस्टिकचा दुष्परिणाम पाहता कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिक बंदीला मुदतवाढ मिळणार नाही. प्लॅस्टिक विक्रेत्यांना महाराष्ट्रात प्लॅस्टिक विकता येणार नाही, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज ठणकावले.

विधानसभेत भाजपाचे आमदार मंगलप्रभाल लोढा यांनी राज्यात प्लॅस्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने काय उपायोजजना केल्या. भाजी तसेच अन्य विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या आढळत असून प्लॅस्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली असा प्रश्न विचारला. तर प्लॅस्टिक निर्मितीच्या व्यवसायात अनेकांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील माल संपेपर्यंततरी प्लॅस्टिक बंदीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज पुरोहित यांनी केली.

त्याला उत्तर देताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, प्लॅस्टिकच्या पिशव्या देणाऱ्यांवर महापालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरू असून लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही कारवाई थांबली होती. मात्र आता पुन्हा कारवाई सुरू झाली आहे. 5 जूनपर्यंत 6369 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून 4 कोटी 12 लाख 20 हजार 588 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रदूषण नियंत्रण मंडळाने 273 कारखान्यांना उत्पादन बंदचे आदेश दिले. त्यांच्याकडून 4 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे सांगतानाच प्लॅस्टिक बंदीचा निर्णय अभ्यास करूनच घेतला असून प्लॅस्टिक निर्मात्यांचे कारखाने महाराष्ट्रात चालू देणार नाही.

अशा कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत प्लॅस्टिक बंदीसाठी मुदवाढ दिली जाणार नाही, असे रामदास कदम यांनी बजावले. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनीही प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे स्वागत करताना उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.