इलेक्ट्रीक इंजिनची चाचणी कुचकामी
दौंड – दौंड-पुणे रेल्वे विद्युतीकरण मार्गाची प्राथमिक चाचणी दोन वर्षांपूर्वीच पार पडली. पुण्याहून दौंडला चाचणी घेणारे इलेक्ट्रीक इंजिन आल्यानंतर इंजीनला पुष्पहार घालून मोठ्या दिमाखात स्वागतही करण्यात आले होती. असताना दौंड-पुणे लोकल प्रवास सुरू होईल, अशी अपेक्षा ठेवली जात होती. मात्र, अजूनही ही सेवा सुरू नसल्याने प्रशांकडून प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दौंड ते पुणे असा प्रवास दररोज करणारे हजारो प्रवासी सध्या मिळेल त्या गाडीने प्रवास करतात. परंतु, डेमू सेवेचाही कोणत्या ना कोणत्या कारणाने फज्जा उडत असतो. त्यामुळे दौंड ते पुणे अशी विद्युत लोकल सुरू व्हावी, अशी प्रवाशांची जुनी मागणी आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्याहून येथे इलेक्ट्रीक इंजिन आले होते, त्यावेळी ही सेवा अवघ्या एका महिन्यात सुरू होईल, असे सांगितले गेले होते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य चाचणी नंतर या मार्गावरून इलेक्ट्रीक इंजिनवर गाड्या धावू लागतील. इलेक्ट्रीक इंजिनवर गाड्या धावू लागल्यानंतर दौंड-पुणे अशी लोकल ही नागरिकांना अपेक्षित असल्याचे सांगितले जात होते. मात्र, ती अद्यापही सुरू झालेली नाही.दौंड ते पुणे दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकल सुरु झाल्यास प्रवाशांची सोय होईल, अशी अपेक्षा होती. या सेवेमुळे तालुक्यातील व्यापारावर चांगला परिणाम होऊन उलाढाल वाढेल, असेही सांगितले जात होते.
दौंड शहर ते पुणे अशी लोकल सेवा सुरू करण्याकरिता रेल्वेच प्रयत्न सुरू असल्याचे आजही सांगितले जात असले तरी गेल्या दोन ते चार वर्षांपासून याबाबत काम सुरू आहे. या कामाकरिता केंद्रीय पातळीवरून निधी उपलब्ध होत असल्याने या कामास काहीसा उशीर होत असला तरी याबाबतचा पाठपुरावा शासकीय अधिकारी तसेच राजकीय पातळीवरूनही होत असल्याने या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम संथगतीने का होईना सुरू असल्याचे सांगितले जात असल्याने दौंडचा प्रवासी वर्ग याकडे डोळे लावून बसला आहे.