जीएसटीवर आपत्ती अधिभार नाही

नवी दिल्ली – सध्या उद्योग व्यवसायाची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे सध्या तरी जीएसटीवर आपत्ती आधिभार लावण्याच्या शक्‍यतेवर कसलाही विचार केला जात नसल्याचे असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये केरळमध्ये महापूर आल्यानंतर त्यावेळी जीएसटीवर आपत्ती अधिभार लावण्यात आला होता. तशा प्रकारचा अधिभार आताही लावण्याच्या शक्‍यतेवर केंद्र सरकार विचार करीत असल्याचे काही वृत्त माध्यमांमध्ये आले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थमंत्रालयाने सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जीएसटी आधिभार लावण्याचा कसलाही विचार नाही.

देशातील उद्योग आणि व्यापार सध्या अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. उत्पादन आणि विक्री थांबली आहे. त्याचबरोबर अनेक उद्योगासमोर मनुष्यबळाच्या तुटवडयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच अधिकार वाढवून आम्ही त्यांचे प्रश्न अधिक बिकट करणार नाही असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि मागणी वाढण्यासाठी केंद्र सरकार बऱ्याच सवलती देत आहे. त्यामुळे अतिरिक्त कर लावणे बरोबर होणार नाही. जगातील कोणत्याही देशाने सध्याच्या परिस्थितीत कर संकलन वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. केंद्र सरकारने अशा प्रकारचा कर लावू नये असे कॉंग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी सांगितले आहे. जर असे केले तर त्याचे भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.