अग्रलेख : पाकिस्तानात खदखद

पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष नेते शाहबाझ शरीफ यांना काल अटक करण्यात आली. शाहबाझ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू. त्यांची राजकीय ओळख म्हणजे दहा ते बारा वर्षे ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते. आता त्यांना मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या बंधूंवरही कारवाई झाली होती. सध्या ते उपचारांसाठी ब्रिटनमध्ये असतात. त्यावेळी नवाज यांची कन्या आणि जावई यांनाही त्रास दिला गेला. पाकिस्तानात लोकशाही नाही. त्या देशात सुरुवातीच्या काळात एका सरकारमध्ये दोन सरकारे असल्याचे म्हटले जायचे. बाहेरचे लोकनियुक्‍त सरकार तर आतले लष्कराचे. मात्र नंतरच्या टप्प्यात आतले सरकार लोकनियुक्‍त सरकारपेक्षा वरचढ ठरत गेले. बरे ही फोड त्या देशातल्या जाणत्या पत्रकारांनीच केली आहे. 

येथे केव्हा, कोणाचे ग्रह फिरतील याचीही काहीच शाश्‍वती नसते. कोण सत्ताधारी होईल व कालच्या सत्ताधाऱ्याचा कसा फुटबॉल होईल याचाही नेम नसतो. सत्तेतून पायउतार होणाऱ्या व्यक्‍तीला एकतर तुरूंगात तरी जावे लागते, अथवा देश तरी सोडावा लागतो. नवाज शरीफ यांना देश सोडावा लागला. त्यांच्या अगोदर बेनझीर भुट्टो यांनाही देश सोडावा लागला. मध्यंतरी अचानक राष्ट्रपती पदाची लॉटरी लागलेले आसिफ अलि झरदारी हे बेनझीर यांचे पतीही सध्या देशाबाहेर आहेत. इतकेच काय राष्ट्रपती पद आणि लष्करप्रमुख पद एकाच वेळी भूषवणारे परवेज मुशर्रफही गणवेष खुंटीला टांगल्यावर सध्या देशाबाहेर आहेत. या सगळ्याचा एकच अर्थ आहे की, येथे लोकनियुक्‍त सरकार अथवा लोकप्रिय नेते असले तरी खरी सूत्रे लष्कराच्याच हातात असतात. त्यातही त्या वेळेचे लष्कर प्रमुख हे सर्वशक्‍तिमान असतात. अनेक राष्ट्रे आपली लोकशाही बळकट आणि पारदर्शी होण्यासाठी प्रयत्नशील असतात.

पाकिस्तानात मात्र लोकशाही आपल्याच आधारावर कशी तग धरून राहील याकरता तेथील लष्कराने सातत्याने प्रयत्न केले. विरोधकांमधील फाटाफूट त्यांच्या पथ्यावरच पडते. तसेच सत्तेवर असलेल्या पक्षाचा नेता त्यांच्या मर्जीनुसार वागतो तोपर्यंत ठीक, अन्यथा त्याची उचलबांगडी करायला ते काही कोर्टात जात नाहीत अन्‌ घटनेचा आधारही घेत नाहीत. शाहबाझ यांना झालेली अटक आणि त्यामागची कारणे वरकरणी योग्य असतीलही. मात्र खरे कारण आहे ते लष्कराला सध्या तरी विरोधी पक्षांची जमवाजमव नको आहे. काही दिवसांपूर्वीच बेनझीर पुत्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो सक्रिय झाले. त्यांच्या पुढाकाराने सर्वच प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले. त्यात गेल्या बऱ्याच काळापासून विजनवासात असलेले नवाज शरीफ यांचाही समावेश होता. पुढाकार जरी बिलावल यांचा होता, तरी बाजी शरीफ यांनी मारली. त्यांनी भाषण केले. त्यात त्यांनी इम्रान यांची लायकी काढली असली तरी आपला लढा त्यांच्या विरोधात नाही, तर आपल्याला तुरूंगात पाठवणाऱ्यांच्या विरोधात असल्याची तोफ डागली. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेही त्यांनी सांगितले.

पाकिस्तानातीलच जबाबदार माध्यमांच्या म्हणण्यानुसार शरीफ यांच्या या भाषणात एकही नवा मुद्दा नव्हता. मात्र त्यांच्या भाषणाने पाकिस्तान ढवळले गेले आहे. कदाचित जेम्स बॉंड धाटणीच्या पंतप्रधानांकडून झालेला भ्रमनिरास, देशाची खस्ता आर्थिक स्थिती, त्याचे भोगावे लागत असलेले परिणाम यामुळे शरीफ आपल्याच मनातले बोलत असल्याची जनतेची भावना झाली नसली तरच नवल. या भाषणाचे पडसाद लष्कराच्या मुख्यालयात उमटले. शरीफ अगोदरच परागंदा झाले आहे. गेल्या वेळेसारखे आता त्यांच्या गैरहजेरीत पक्षाचा कारभार पाहणाऱ्या त्यांच्या पत्नीही हयात नाहीत. त्यामुळे शाहबाझ हेच शरीफ यांचे पाकिस्तानातील अधिकृत प्रतिनिधी ठरतात. यातूनच त्यांची कोंडी करण्याचा डाव घडवून आणला गेला असण्याची दाट शक्‍यता आहे. भ्रष्टाचाराच्या नावावर आरोप करत बदनाम केल्यानंतर कारवाई करता येते हे तेथील सगळ्याच सत्ताधाऱ्यांना माहीत झाले आहे.

इम्रान खानही त्याला अपवाद ठरले नाहीत. वास्तविक एका नव्या घटना आणि कायद्याने चालणाऱ्या लोकशाहीची फेरस्थापना करण्यासाठी इम्रान पुढाकार घेऊ शकले असते. त्यांचा क्रिकेटचा इतिहास आणि त्यामुळे लाभलेली लोकप्रियता या आधारावर काही बदल निश्‍चितच करू शकले असते. मात्र त्यांना ते जमवता आले नाही. त्याला कारण मुळात त्यांची पंतप्रधान पदावरची स्थापनाच लष्कराच्या आशीर्वादाने आणि लबाड्या करून झाली असल्याचे आरोप झाले आहेत. खुद्द त्यांच्या माजी पत्नीनेही त्यांच्यावर जाहीर आरोप केले आहेत. शाहबाझ यांची अटक या सगळ्यातून म्हणजे लष्कराला नको असलेल्या स्थितीतूनच उद्‌भवली आहे. पाकिस्तानात दरम्यानच्या काळात मुशर्रफ आणि अन्य दोघा तिघांची सर्वोच्च पदावर वर्णी लागली असली तरी शरीफ आणि भुट्टो घराणे हेच त्या देशाच्या राजकारणातील फर्स्ट फॅमिली आहेत. लोकांमध्ये त्यांचे विशेष स्थान आहे. ते काही काळासाठी राजकीय पडद्याआड गेले, तरी लोकांच्या विस्मृतीत जात नाहीत. 

शरीफ यांनी नव्या दमाने केलेले आरोप आणि विरोधकांचे एका मंचावर येणे यात लष्कराला काय मिळायचा तो संदेश मिळाला अन्‌ काही तासांच्या आत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्या देशात लोकशाहीची कथितपणे फेरस्थापना करायची असेल किंवा किमान तसा देखावा तरी करायचा असेल तर पूर्वी अमेरिकेचा त्यांना धाक होता. सध्या अमेरिकेने पाकिस्तानातून बऱ्यापैकी अंग काढून घेतले आहे. शिवाय आपल्या देशातील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तेथील सत्ताधारी गुंतले आहेत. पाकिस्तानची चीनशी बरीच जवळीक निर्माण झाली आहे. तोही एक अँगल याला आहे. त्यांच्या लष्करालाही आता अमेरिकेपेक्षा चीन अधिक जवळचा वाटतो आहे. चीनच्या पाक आणि नापाक अशा सगळ्यांच कृत्यांत लष्कराचे अधिकारी सहभागी असल्याचे गेल्या काही काळात समोर आले आहे. 

गलवान भागात चीनने भारताविरुद्ध आगळीक करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी चिनी अधिकाऱ्यांचे पाकिस्तानातील गोपनीय दौरेही माध्यमांतून झळकले होते. चीनने पाकमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यावर तो देश पाणी सोडणार नाही. लोकप्रिय सरकार आणि नेता वगैरेच्या भानगडीत न पडता वचक असलेले लष्कर हे त्यांच्या दृष्टीने केव्हाही श्रेयस्कर. त्यामुळेच विरोधी पक्षांचे ऐक्‍य अधिक दृढ होण्याच्या अगोदरच त्यांच्याकडूनही पाकिस्तानात नकाराधिकार वापरला गेला असण्याची शक्‍यता आहे. शरीफ यांची अटक त्याचेच संकेत देत आहे. 

पाकिस्तानात सत्तापरिवर्तन होते. मात्र त्याला अगोदर लष्कराचा आशीर्वाद असावा लागतो. इम्रान यांचे दिवस भरले तर ते याच आशीर्वादाने जातीलही. मात्र जर लष्कराला आता तसे नको असेल, तर विरोधकांना धाकात घेऊन पांगवण्याचा प्रयत्न पूर्ण शक्‍तीने केला जाईल. त्याची सुरुवात झाली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.