पंजाब आणि हरियाणासाठी आपबरोबर आघाडीची चर्चा नाही- कॉंग्रेस

नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीत पंजाब आणि हरियाणामध्ये आम आदमी पार्टीबरोबर आघाडी करण्यासाठी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे आज कॉंग्रेसच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. दिल्लीमध्ये आपबरोबर आघाडी करण्यासाठी अद्याप कोणताही निष्कर्श काढण्यात आलेला नाही, असेही कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितले. कॉंग्रेस पक्षाने पंजाब आणि हरियाणामध्येही “आप’बरोबर आघाडी केली तरच दिल्लीमध्ये कॉंग्रेसबरोबर आघाडी केली जाईल, असे “आप’च्या नेत्यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. तसेच दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्याच्या मागणीला पाठिंबा देण्याच्या अटीवरच दिल्लीत कॉंग्रेस बरोबर आघाडी केली जाईल, असेही “आप’ने म्हटले आहे.

पंजाब आणि हरियाणामध्ये आघाडी करण्यासाठी अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर चर्चा झालेली नाही. या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार लवकरच जाहीर केले जातील. दिल्लीमध्ये “आप’बरोबरच्या आघाडीचा निर्णयही लवकरच जाहीर केला जाईल, असे सुर्जेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी “आप’बरोबरच्या आघाडीसंदर्भात आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. दिल्ली कॉंग्रेस अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रभारी पी.सी.चाको आणि अन्य नेते राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.