मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्यासाठी कोणतीही मुदत नाही 

– चीनने फेटाळला अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडचा प्रस्ताव 
-तडजोडीच्या दिशेने प्रगती सुरू असल्याचाही दावा

बिजींग – मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने 23 एप्रिलपर्यंत दिलेला “अल्टिमेटम’चीनने फेटाळून लावला आहे. मसूदला जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी अशी कोणतीही मुदत असू शकत नाही. या मुद्दयावर तडजोड केली जाण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे चीनने म्हटले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर मसूद अझहरला संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या 1267 नियमान्वये जागतिक दहशतवादी ठरवण्यासाठी अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडकरून नव्याने प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र चीनने तांत्रिक मुद्दयाचे कारण पुढे करून या प्रस्तावाला अटकाव केला होता. त्यामुळे मसूदला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सने थेट संयुक्‍त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्येच प्रस्ताव सादर केला.

नकाराधिकार असलेल्या चीनने त्यालाही विरोध केला आहे. यामुद्दयावर 1267 कमिटीतून तडजोडीतून मार्ग शोधला जायला हवा. ही कमिटी देखील संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेअंतर्गतच काम करते, असे कारण चीनने दिले आहे. त्यावरच हा प्रस्ताव मांडणाऱ्या अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंडने चीनला 23 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. जर चीनने तांत्रिक अटकाव मागे घेतला नाही, तर या मुद्दयावर चर्चा घडवून आणावी लागेल, असे या देशांनी म्हटले होते. पण अशी कोणतीही मुदत लागू होत नसल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते लु कांग यांनी सांगितले.

संयुक्‍त राष्ट्राची सुरक्षा परिषद आणि 1267 नियमांची कमिटी स्वतःच्या नियमांनुसारच काम करते. अशाप्रकारे मुदतीमध्ये निर्णय घेण्याचा नियम कोठून शोधून काढला, हे आगोदर स्पष्ट करावे. मसूदबाबतची चीनची भूमिका स्पष्ट आहे. याबाबत सहकार्यानेच तोडगा शोधला जाऊ शकतो. सहमतीशिवाय कोणतीही कृती समाधानकारक असू शकत नाही, असेही कांग यांनी म्हटले आहे.

मसूदबाबत संबंधितांशी चर्चा सुरू असून तडजोडीच्या दृष्टीने या विषयाची प्रगती सुरू आहे. संयुक्‍त राष्ट्रातील बहुतेक देशांच्या सहकार्याच्या मतांचा मान राखला जावा आणि 1267 च्या चौकटीतच या मुद्दयावर विचार केला जावा, असे चीनने म्हटले आहे. मात्र तांत्रिक अडथळे आणण्यामागील चीनची नेमकी भूमिका काय, असे विचारले असता “तडजोडीच्या दिशेने प्रगती सुरू आहे.’ असे उत्तरच कांग यांनी पुन्हा सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.