रायगड (प्रतिनिधी) : शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके, गडपूजन व शिर्काई देवीच्या गोंधळाने शिवराज्याभिषेक सोहळ्याची पूर्वसंध्या रोमांचित झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने यंदा साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आज मेघडंबरीतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक होणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा केला जाणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवभक्तांशी चर्चा करून तसा निर्णय घेतला आहे. आज सकाळी कोल्हापूरहून समितीचे काही कार्यकर्ते रायगडावर आले.
समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांच्या हस्ते सायंकाळी गडपूजन झाल्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर झाली. त्यानंतर शिर्काई देवीचा गोंधळ झाला. मशालींच्या उजेडात तो सादर करण्यात आला.
दरम्यान, युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते उद्या (दि. ६) राजसदरेवरून कोरोना योद्धयांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रमाणपत्र समर्पित केले जाणार आहे.
समितीचे माजी नगरसेवक विनायक फाळके, वरुण भामरे, संजय पोवार, प्रवीण हुबाळे, सत्यजित आवटे, राहुल शिंदे, सागर दळवी, प्रवीण पोवार, अमर पाटील, सोमनाथ लांबोरे, योगेश केदार, दयानंद हुबाळे, श्रीकांत शिराळे, अमर जुगर, दीपक सपाटे, विश्वास काशीद गडावर दाखल झाले असून त्यांनी रात्री मेघडंबरीची सजावट केली.
आज असा होणार सोहळा :
– ध्वजपूजन व ध्वजारोहन, स्थळ : नगारखाना
– युवराज संभाजीराजे छत्रपती व यौवराज शहाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मुर्तीसह राजसदरेवर आगमन
– युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक
– मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे शिवभक्तांना मार्गदर्शन
– युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीसह जगदीश्वराचे दर्शनासाठी प्रस्थान
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळास अभिवादन