राज्यात करोनाचा एकही रुग्ण नाही : विभागीय आयुक्तांची माहिती
पुणे – शहरासह राज्यात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना केले आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अडीच ते 3 टक्के असून विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती डॉ. म्हैसेकर यांनी शुक्रवारी दिली.
करोनासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, डॉ. अजय चंदनवाले, डॉ. संजय देशमुख, डॉ. अशोक नांदापूरकर, डॉ. भगवान पवार, विमानतळ प्राधिकरण संचालक कुलदीपसिंग, डॉ. रामचंद्र हंकारे आदी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, मुंबई, पुण्यासह देशातील 23 विमानतळांवर प्रवाशांचे स्क्रिनिंग होत आहे. यामध्ये संशयितांना विलगीकरण कक्षात भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालयात, निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) येथे केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांसाठी विलगीकरण व्यवस्था केली आहे.
सध्या वातावरणात बदल होत आहे, हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत आहे. यामुळे सर्दी-पडसे होऊ शकते. नागरिकांनी घाबरून न जाता उपचार घ्यावेत. सर्वसामान्य नागरिकांच्या करोनाविषयक शंका- समाधानासाठी 104 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. आरोग्य सेवा संचालक पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष असून तो सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत कार्यरत असेल.
– नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी.