“व्हॉट्‌सऍप’ प्रचारावर कंट्रोलच नाही

“व्हॉट्‌सऍप’वरील संदेश पाहणे अशक्‍य

“फेसबुक’, “ट्विटर’ इत्यादी सोशल मीडिया या “खुल्या प्लॅटफॉर्म’वर असतात. म्हणजेच कुणीही यावरील संदेश, माहिती पाहू शकतो. मात्र “व्हॉट्‌सऍप’वरील संदेश ही अशक्‍य बाब आहे. “व्हॉट्‌सऍप’वरील व्यक्तिगत संदेश हे “एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन’ने संरक्षित केले असतात. म्हणजेच संदेश पाठविणारा व ज्याच्या क्रमांकावर संदेश जात आहे याव्यतिरिक्त इतर व्यक्ती हे संदेश पाहू शकत नाही. शिवाय एखाद्या उमेदवाराच्या नावाने एकाहून जास्त “सीमकार्ड’ व स्मार्टफोन असतील तर एकाच वेळी अनेक “व्हॉट्‌सऍप ग्रुप’ तो तयार करू शकतो. अशा स्थितीत मतदानाच्या दिवशी प्रचार सुरू असला तरी त्याला “ट्रॅक’ करू शकणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

नगर – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कधी नव्हे ते सोशल मीडियाला उमेदवारांकडून जास्त महत्त्व देण्यात येत आहे.”व्हॉट्‌सऍप’, “फेसबुक’सह विविध माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. उमेदवारांच्या “सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक लक्ष ठेवणार असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. मात्र प्रत्यक्षात “व्हॉट्‌सऍप’सारख्या ऍप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी “सायबर सेल’ तसेच आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नाही. अशा स्थितीत प्रचार संपल्यानंतर मतदानापर्यंत नियमांना धाब्यावर बसवून “सोशल मीडिया’वर प्रचाराचा धुरळा उडतच राहण्याची चिन्हे आहेत. या प्रचारावर आयोग लक्ष ठेवणार तरी कसा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

निवडणुकीत उमेदवारांच्या “सोशल मीडिया’वरील प्रचारावर बारीक नजर राहणार असल्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला होता. यासंदर्भात लक्ष देखील ठेवण्यात येत असून त्याच्या खर्चाची आकडेवारी देखील उमेदवार आयोगाकडे सादर करत आहेत. विविध संकेतस्थळांसोबतच व्हॉट्‌सऍप’वर सर्वात जास्त प्रचार होताना दिसून येत आहे. या माध्यमातून एकाच वेळी कमी खर्चात जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचणे शक्‍य असल्याने अनेक उमेदवारांची प्रचार यंत्रणा यावर भर देत आहे. उमेदवारांच्या सोशल मीडिया “हॅडलर्स’ तसेच कार्यकर्त्यांकडून विविध “ग्रुप’ तयार करण्यात आले आहे व दररोज शहरातील लाखो लोकांपर्यंत विविध “ग्रुप्स’च्या माध्यमातून संदेश पोहोचत आहेत.

निवडणूक आयोगाने “सोशल मीडिया’वरील प्रचारावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. मात्र “व्हॉट्‌सऍप’वरील संदेशांची चाचपणी करणे ही कठीण बाब आहे. शिवाय उमेदवारांचे कार्यकर्ते, प्रचार यंत्रणा लक्षात घेता प्रत्येकाच्या फोनमधील व्हॉट्‌सऍप’ची तपासणी करणे शक्‍यच नाही. “व्हॉट्‌सऍप’वर नेमक्‍या कुठल्या संदेशांची देवाणघेवाण होत आहे, यावर लक्ष ठेवण्याची यंत्रणा आयोगाकडे नाही.

सोशल मीडियाबाबत तक्रारी दाखल

व्हॉट्‌सऍप व फेसबूकवर पाठविण्यात आलेल्या संदेशावरून नगर दक्षिणेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेषतः भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रतिनिधींनी सोशल मीडियावरील संदेश तक्रारी केल्या आहेत. व्हॉट्‌सऍपच्या संदेशावर त्यांनी आक्षेप घेवून मोबाईल नंबर सह तक्रार दाखल केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.