संपर्क नसल्याचा नाराजीचा पाटणमध्ये फटका

पाटण मतदारसंघात नरेंद्र पाटील यांना आघाडी, विधानसभेसाठी राष्ट्रवादीपुढे आव्हान

– सूर्यकांत पाटणकर

पाटणमध्ये उदयनराजेंचे आभारप्रदर्शन

संपर्क नसल्याच्या नाराजीचा पाटणमध्ये फटका पाटणमध्ये उदयनराजेंचे आभारप्रदर्शन लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम पाटणमध्ये येवून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांचे अभिनंदन करण्यात आले. पाटण तालुक्‍यातील जनतेचे आभारही त्यांनी मानले. येथील सिद्धिविनायक मंदीरात जाऊन त्यांनी दर्शन घेवून ते कराडला रवाना झाले.

विधानसभेच्या तयारीसाठी

लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाटण विधानसभा मतदारसंघात उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आमदार शंभूराज देसाई, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर प्रचाराच्या निमित्ताने गावागावात पोहचले.
प्रचार लोकसभेचा असला तरी तयारी मात्र या दोन्ही नेत्यांची विधानसभेसाठी होती.

पाटण  – लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पाटण तालुक्‍यातील राजकारण पुन्हा ढवळून निघाले. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी या मतदारसंघात आघाडी घेतली. देसाई- पाटणकर गटांची समसमान ताकद याठिकाणी आहे. मात्र, खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल असणाऱ्या नाराजीचा फटका त्यांना बसला आहे.

पाटण तालुक्‍याचे राजकारण नेहमीच देसाई-पाटणकर यांच्याभोवती फिरत राहिले आहे. पक्षीय बोलबाला याठिकाणी बाजूला पडत असून गटा-तटाच्या राजकारणाला याठिकाणी नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणारे नरेंद्र पाटील यांना तालुक्‍यातून मिळालेले मताधिक्‍य समाधानकारक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला मात्र आत्मचिंतन करायला लावणारे नक्कीच आहे.

गेल्या पाच वर्षात पाटण तालुक्‍याशी संपर्क तुटलेल्या उदयनराजेंबद्दल मतदारसंघात असणारी प्रचंड नाराजी समोर आली. त्याचा फायदा नरेंद्र पाटील यांना झाला. लोकसभा निवडणुकीत सेनेचे आमदार असणाऱ्या शंभूराज देसाई यांनी मित्र असणाऱ्या उदयनराजेंना बाजूला ठेवल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी चांगले परिश्रम घेतले होते. आमदार देसाई यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे काम करा, असा आदेश दिल्याने देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनीही चांगले काम केले. मात्र, नरेंद्र पाटील यांच्या प्रचारातील विस्कळीतपणामुळे काही गावांत त्यांना पोहचणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे कमी कालावधीत मिळालेली मते समाधानकारक आहेत. गत निवडणुकीत खासदार उदयनराजे यांना चाळीस हजारच्यावर मताधिक्‍य पाटण विधानसभा मतदारसंघातून मिळालेले होते.

पाटण विधानसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या मताधिक्‍यात झालेली घट ही राष्ट्रवादीला चिंता करायला लावणारी आहे. यावेळी मतदारांची संख्या वाढूनही मतदानात झालेली घट अनपेक्षित आहे. नरेंद्र पाटील हे तालुक्‍यातील उमेदवार असलेतरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य कमी नाही. माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांची पकड आजही मतदारसंघावर कायम आहे. मात्र, उदयनराजे भोसले यांचा तालुक्‍यात कमी झालेला संपर्क, विकासकामांचा अभाव व स्थानिक उमेदवार यामुळे मताधिक्‍यात घट झाली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here