साई समाधी दर्शनासाठी ड्रेसकोडची सक्ती नाही

शिर्डी  -श्री साईबाबा समाधी मंदिरात काही भक्त तोकडे कपडे घालून येतात. त्याबाबत संस्थानकडे काही भक्‍तांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे साई संस्थानने पूर्ण पोशाख किंवा भारतीय संस्कृतीस अनुसरुन पोशाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे, असे आवाहन वजा विनंती केली होती. तसे फलकही मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

कान्हूराज बगाटे म्हणाले, श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्‍त तोकड्या पोशाखात येतात, अशा तक्रारी काही भक्‍तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेवून संस्थान प्रशासनाकडून पूर्ण पोशाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरिता यावे, असे आवाहन वजा विनंती करण्यात आली आहे. तसे फलक मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले आहेत. याबाबत अद्याप एकाही भक्‍ताने या निर्णयाला आक्षेप घेतलेला नसून, सदरचा निर्णय योग्यच आहे, असा अभिप्रायही त्यांनी नोंदविलेला आहे. संस्थानच्या वतीने साईभक्‍तांना याबाबत कुठलीही सक्‍ती केली नसून, फक्‍त आवाहन करण्यात आलेले आहे.

तसेच सध्या करोनाची साथ असून, राज्य शासनाच्या आदेशान्वये 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत. या व्यवस्थेबाबत साईभक्‍तांमधून समाधान व्यक्‍त केले जात आहे, असे बगाटे म्हणाले.

 

साई मंदिर खुले झाल्यापासून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी संस्थानच्या वतीने घेण्यात येत असून, एकही कर्मचारी बाधित आढळून आलेला नाही. दर्शनाकरिता आलेल्या साईभक्‍तांचे नाव व मोबाइल क्रमांकांची नोंद घेण्यात येत असून, दोन ते तीन दिवसांनंतर दूरध्वनीवरून त्यांना संपर्क करुन त्यांच्या आरोग्याची माहिती घेण्यात येत आहे.
कान्हूराज बगाटे , मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.