स्वराज्याच्या ‘महाराणीं’च्या डोक्‍यावर छत्र नाही

राजगडावरील सईबाईंच्या समाधीची मोठी दुरवस्था; तरी सरकारचे दुर्लक्ष

– भुजंगराव दाभाडे

भोर – राजगडच्या पद्मावती माचीवर पद्मावती मंदिर परिसरात असलेली सईबाईंची समाधी अत्यंत दुरवस्थेत असून वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत उघड्यावर उभी आहे. अक्षरश: एखादा चौथरा वाटावा, अशा या समाधीचा जीर्णोद्धार होऊन तिच्यावर छत्र बांधले जाण्याची नितांत गरज आहे. स्वराज्याची पहिली महाराणी, ही अशी उन्हातान्हात, वाऱ्या-पावसात पाहून गडावर जाणारा प्रत्येक शिवप्रेमी हळहळत गडावरून खाली उतरतो आहे, स्वराज्याच्या मावळ्यांच्या भावनांचा विचार करून या समाधीचा जीर्णोद्धार करावा. समाधीस्थळी त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

राजगडावरील सईबाईंच्या समाधीच्या दुरवस्थेबाबतचा प्रश्‍न खासदार सुळे यांनी उपस्थित केला असून याबाबतचा पाठपुरावा त्या करीत आहेत. स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरून शिवाजी महाराजांनी सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 26 वर्षे मराठी मुलुखावर राज्य केले. याच गडावर महाराणी सईबाई यांचे निधन झाले. स्वराज्याच्या पहिल्या महाराणी, छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई यांनी याच गडावर अखेरचा श्‍वास घेतला आणि तेथेच त्यांना भडाग्नी देण्यात आला. यामुळे राजगड आणि त्यावर असलेल्या सईबाईंच्या समधीला मोठे महत्त्व आहे.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राजगडावरून खाली उतरणारा प्रत्येक जण याबाबत हळहळ व्यक्त करीतच उतरतो. त्यांच्यापैकी कित्येकांनी आपल्याला प्रत्यक्ष भेटून, पत्रे पाठवून किंवा संपर्क साधून महाराणी सईबाईंच्या भग्न समाधीविषयी दु:ख व्यक्त केले आहे, अजूनही करीत आहेत. आपण, दोन वर्षांपूर्वी पर्यटनमंत्र्यांना पत्र लिहूनही, याबाबतही सुळे यांनी खंत व्यक्त केली.

राजगडावरील सईबाई यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुळे यांनी मागणी केली असून यापूर्वी दि. 29 नोव्हेंबर 2017ला त्यांनी यासंदर्भात पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना पाठविलेल्या पत्राची आठवणही करून दिली आहे. या समाधीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शिलेदार असलेले किल्ले तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ल्‌यांची देखभाल दुरुस्ती आणि मढे घाटात नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारा….
सिंहगडावर तानाजी मालुसरे यांनी देह ठेवल्यावर त्यांचे पार्थिव मढे घाट मार्गे कोकणातील त्यांचे मूळ गाव उंबार्डे (ता.भोर) येथे नेण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि शिवप्रेमींच्या मनात या इतिहासाची आठवण कायमस्वरूपी जागृत रहावी, यासाठी मढे घाटात तानाजी मालुसरे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

राजगडावरील सईबाईंच्या समाधी स्थळाच्या दुरवस्थेबाबत दोन वर्षांपूर्वी पर्यटन मंत्र्यांना पत्र लिहून कळविले होते, त्यासाठी आवश्‍यक निधीची पूर्तता करून लवकरात लवकर समाधीचा जीर्णोद्धार करावा आणि त्यांचा पुतळाही उभारावा, अशी मागणीही केली होती. तथापि अजूनही त्यावर सरकारने काहीही कार्यवाही केलेली नाही. याबाबत सतत पाठपुरावा करीत आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)