आगामी काळात व्याजदर कपातीची शक्यता
पुणे – केंद्र सरकारच्या विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये चौथ्या तिमाहीसाठी कसलाही बदल करण्यात आलेला नाही. या तिमाहीमध्ये बॅंकांनी आपल्या ठेवींवरील व्याजदरात बरीच कपात केली आहे. त्यामुळे सरकारही अल्पबचत योजनावरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याचे, असे बोलले जात होते.
मात्र, सरकारने अल्पबचतीवरील व्याजदर कमी न करता कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीपीएफ व नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे एनएससीवरील व्याजदर 7.9 टक्के या पातळीवर कायम ठेवला आहे.
किसान विकास पत्र म्हणजे केव्हीपीवरील व्याजदर 7.6 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक 3 महिन्यांला सरकार अल्पबचत योजनावरील व्याजदर आडावा घेऊन जाहीर करीत असते. त्यानुसार 2019-20 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठीचे अल्पबचततीवरील व्याजदर तिसऱ्या तिमाहीच्या पातळीवर कायम ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या तिमाहीत 1 जानेवारी 2020 ते 31 मार्च 2020 या कालखंडाचा समावेश आहे.
“ज्येष्ठ नागरिक बचत’चा व्याजदर 8.6 टक्के
पंचवार्षिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 8.6 टक्के या पातळीवर कायम ठेवण्यात आलेला आहे. हे व्याज प्रत्येक तिमाहीला दिले जाते. केंद्र सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्प सादर करताना अल्पबचतती वरील व्याजदर सरकारी रोख्यांवरील परताव्याशी संलग्न केले जातील असे म्हटले होते. रिझर्व्ह बॅंक एकूणच व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी काळात अल्पबचतीवरील व्याज दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.