मृतांच्या आकडेवारीतही गडबड

“डॅशबोर्ड’वर एकूण 59, तर “प्रेसनोट’मध्ये 57 मृत्यू
दोनदा प्रेसनोट पाठवूनही डॅशबोर्डपेक्षा कमीच आकडा
पिंपरी (प्रतिनिधी) –
शहरात दिवसाला बाधित येणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिका गेल्या अनेक दिवसांपासून बाधितांच्या आकडेवारीत लपवाछपवी करत आहे. आता तर मृतांची आकडेवारीतही गडबड होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या डॅशबोर्ड आणि महापालिकेच्या प्रेसनोटमध्ये नेहमीच तफावत दिसून येते. शनिवारी डॅशबोर्डच्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात शहरातील सहा आणि शहराबाहेरील एक अशा सात रुग्णांचा करोनाने मृत्यू झाल्याचे दर्शविले जात होते. सायंकाळी महापालिकेने पाठविलेल्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रेसनोटमध्ये देखील 24 तासात चारच मृत्यू दाखविण्यात आले. दुसऱ्या प्रेसनोटमध्ये मात्र एकूण मृतांचा आकडा बदलून 57 करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजारपर्यंत पोहोचली आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी शहरातील 191 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामध्ये 117 पुरुष व 74 महिलांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर शहराबाहेरील 18 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 10 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या 3967 झाली आहे. तर महापालिकेच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास 4032 एकूण रुग्णसंख्या देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी 256 रुग्णसंख्या येणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने 191 रुग्णसंख्या दाखविली आहे. म्हणजेच 65 रुग्णांची माहिती दिली नाही. अशाप्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने रुग्णसंख्येत लपवाछपवी केली जात आहे.

शहरामध्ये करोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शुक्रवारी एकाच दिवशी सात मृत्यू झाले. शनिवारीदेखील शहरातील सहा आणि शहराबाहेरील एक अशा सात मृत्यूंची नोंद डॅशबोर्डवर करण्यात आली आहे. मात्र प्रसिद्धीपत्रकात फक्त चारच मृत्यू दाखवत प्रशासनाने मृतांमध्येही लपवाछपवी केली आहे. महापालिकेने पाठविलेल्या पहिल्या प्रेसनोटमध्ये शहरातील एकूण मृत्यूसंख्या 53 आणि शहराबाहेरील परंतु 32 होती. तर दुसऱ्या प्रेसनोटमध्ये एकूण मृतांची संख्या वाढवून 56 दाखविण्यात आली. तर डॅशबोर्ड शनिवारी शहरातील मृत्यूंची संख्या 59 आणि आणि शहराबोहरील मृतांची संख्या 33 इतकी होती. म्हणजेच शहरात सात रुग्णांचा एका दिवशी मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाने चार मृत्यू दाखवले. प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, आज मृत झालेले रुग्ण एम्पायर एस्टेट चिंचवड व सेक्‍टर 25 निगडी येथील 78 व 62 वर्षीय दोन महिला तसेच सानेवस्ती चिखली व वाल्हेकरवाडी येथील दोन पुरुष अशा चार जणांचा मृत्यू झाला. करोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

शनिवारी 1237 संशयितांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये शनिवारी एकूण 2250 रुग्ण आणि संशयित दाखल करण्यात आले होत. आतापर्यंत 28493 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

एकाच दिवशी 3751 संशयित रुग्ण दाखल
शहरात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात आहे. शनिवारी एकाच दिवशी तब्बल 3751 रुग्णांना महापालिकेच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांत दाखल केलेल्या रुग्णांपैकी 1237 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

136 रुग्ण करोनामुक्‍त
आतापर्यंत शहरातील 2669 रुग्ण करोनामुक्‍त झाले आहेत. आज 136 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्यांना पाच दिवसांनंतर घरी सोडण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.