पृथ्वीराजबाबांमध्ये धमक आहेच; जिल्हा कॉंग्रेसने अजित पवारांना ठणकावले

त्यांच्यामुळेच बारामती, सातारा मेडिकल कॉलेजला मंजुरी, माण-खटावला पाणी

सातारा -माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कामाची धमक नेहमीच दाखवली आहे. बारामतीला शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करण्याच्या आदेशावर पृथ्वीराज चव्हाण यांची सही होती. 

सातारा मेडिकल कॉलेज, माण-खटावला उरमोडीचे पाणी, जिल्ह्यातील प्रशासकीय इमारतींची उभारणी आदी कामे त्यांच्या माध्यमातून झाली आहेत, हे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्षात ठेवावे आणि मगच त्यावर भाष्य करावे, असा इशारा सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

वडूज येथे शनिवारी (दि. 25) झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती.
बारामती व सातारचे मेडिकल कॉलेज एकाच वेळी मंजूर झाले. बारामतीतील कॉलेज पूर्ण होऊन सर्व प्रक्रिया झाली आहे; परंतु सातारचे काम अजून रखडले आहे.

काम करायला धमक लागते, असे म्हणत ना. पवार यांनी अप्रत्यक्षरित्या पृथ्वीराज चव्हाण यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत, अजितदादांना ठणकावले. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्या रजनी पवार, ऍड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस ऍड. दत्तात्रय धनवडे, नरेश देसाई, अन्वरपाशा खान, रफीक बागवान, मनोजकुमार तपासे उपस्थित होते.

दुष्काळी माण-खटाव तालुक्‍यात उरमोडीचे पाणी कोणी नेले, त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न आणि अध्यादेशावरील सही कोणाची, याचीही माहिती अजित पवारांनी घ्यावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात प्रशासकीय इमारतींना मंजुरी आ. चव्हाण यांनीच दिली होती. आरोग्य सेवेसाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा, ही त्यांचीच कल्पना होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी काय काय केले याची यादीच देऊ, असा इशारा कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. पृथ्वीराजबाबांनी धडाडीने निर्णय घेतल्याने विकासकामे झाली, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विसरू नये.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीची संकल्पना कोणाची होती, तेदेखील लक्षात घ्या. सातारचे मेडिकल कॉलेज पृथ्वीराजबाबांनी मंजूर केले; परंतु तुमच्या कृष्णा खोऱ्याच्या गोंधळामुळे ते रखडले, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला.

जिल्हा बॅंकेत चार जागांसाठी ठाम
जिल्हा बॅंक निवडणुकीत कॉंग्रेसने चार जागा मागितल्या आहेत. या जागा सन्मानाने दिल्या, तर आम्ही राष्ट्रवादीबरोबर आहोत, अन्यथा आम्ही स्वतंत्र पॅनल टाकू. त्याबाबत अंतिम निर्णय आ. पृथ्वीराज चव्हाण घेतील. त्यांच्याशी चर्चा करुनच रणनीती ठरवणार आहे. जिल्हा बॅंक निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधी पॅनेलसंदर्भात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व आ. चव्हाण यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामध्ये येण्यास आ. जयकुमार गोरे उत्सुक होते; परंतु त्यांना आम्ही सर्वपक्षीय पॅनेलमध्ये घेणार नाही, असे डॉ. जाधव, ऍड. कणसे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.