क्‍लिनीकल ट्रायल मध्ये कोणतीही तडजोड नाही; लस पुर्ण सुरक्षित – वैज्ञानिक गगनदीप कांग

नवी दिल्ली – कोविडवरील लस अल्पावधीतच विकसित करण्यात आली असली तरी त्याच्या सुरक्षेविषयी कोणतीही चिंता बाळगण्याचे कारण नाही, कारण या लसीच्या क्‍लिनीकल ट्रायल मध्ये कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही असे लस वैज्ञानिक गगनदीप कांग यांनी म्हटले आहे.

या विषयी लोकांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या साऱ्या शंका त्यांनी धुडकाऊन लावल्या आहेत.
गगनदीप या विषाणुजन्य आजारांच्या विरोधात जी जागतिक यंत्रणा कार्यरत आहे त्यात कार्यरत असलेल्या महिला तज्ज्ञ आहेत. लंडनच्या रॉयल सोसायटी मध्येही त्या कार्यरत आहेत.

पीटीआयशी बोलताना त्या म्हणाल्या की या लसी बाजारात अपेक्षेपेक्षा लवकर येत असल्या तरी त्यांच्या क्‍लिनीकल चाचण्या निर्धारीत टप्प्यांनुसारच घेण्यात आल्या आहेत. लसीच्या चाचण्यांमधील कोणताही टप्पा वगळला गेलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

साधारणपणे कोणत्याही लसीच्या चाचण्यांचे परिणाम तपासण्यासाठी एक वर्ष ते सहा महिन्यांचा कालावधी घेतला जातो पण यावेळी त्याच्या आधीपासूनच लसीच्या वापराला अनुमती दिली गेली असली तर वर्ष-सहा महिने थांबल्याने त्याच्या परिणामात कोणताही फरक पडत नसतो असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

ही लस सर्वांनाच समप्रमाणात उपलब्ध व्हावी अशी अपेक्षाहीं त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात व्यक्त केली. लसीसाठी शीतपेट्या किंवा मोठ्या फ्रिजर्सची आवश्‍यकता असते. ज्या ठिकाणी अशी सोय होईल त्या ठिकाणच्याच नागरीकांना ही लस प्रथम मिळेल आणि जिथे ही सोय नसेल तेथील नागरीकांना लसीपासून वंचित राहावे लागेल अशी स्थिती उद्‌भवताकामा नये हीच आमची खरी चिंता आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.