कात्रज, दि. 9 (प्रतिनिधी) -कात्रज चौक पीएमपीएल बसस्थानकापासून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याचे गेल्या महिन्यांमध्येच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, पावसात संपूर्ण डांबर उघडून खड्डेच खड्डे पडले आहेत. यामुळे खड्डे पडून संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. परंतु, पथविभागाचे या खड्ड्यांकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
कात्रज चौक पीएमपीएल बसस्थानकापासून दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ड्रेनेज शेजारीच खड्डे पडून ड्रेनेज झाकणे धोकादायक झाली आहेत. रस्त्यावरील संतोषनगर लेन नंबर-5 व सहा या ठिकाणी ड्रेनेज झाकणाशेजारीही मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीचे अपघात घडत आहेत. खड्डे पडल्याने रस्त्यावर वाहन चालक व पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. सकाळी व संध्याकाळी या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
कात्रज परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. कात्रज-दत्तनगर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत आहेत. पावसामुळे डांबराचा प्लांट बंद असल्यामुळे डांबर उपलब्ध होत नाही. लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवण्यात येतील.
– भावना जाडकर. कनिष्ठ अभियंता, पथविभाग