राज्यात विरोधकच राहिलेले नाहीत – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) – कॉंग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, ना शेंडा ना बुडखा अशी कॉंग्रेसची अवस्था आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसही संपत आली आहे. निवडणूका झाल्यावर त्यांच्यात जे कोणी शिल्लक राहतील ते सुद्धा आपल्या पक्षात येतील, अशी मानसिकता त्यांच्यात निर्माण झाली आहे, असा टोला लगावतानाच विधानसभा निवडणूकीत महायुतीसमोर राजकिय विरोधक कोणी राहिलेले नाही, अशी टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आघाडीवर केली.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

लोकसभा निवडणूकीच्यावेळी याठिकाणी सभा झाली तेव्हाही असाच जनसागर होता. आता महाराष्ट्रात भगवं वातावरण दिसतं आहे. समोर दुसरं कुणी आहे की नाही तेच कळत नाही असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे यानी लगावला. कॉंग्रेस पक्ष थकला आहे अशी कबुली सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष 50-60 वर्षे खाऊन खाऊन थकले आहेत. आता खाण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. कारण आता न खाणाऱ्यांच्या हातात देश आणि महाराष्ट्र आलेला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वातंत्र्याच्या लढ्यात कॉंग्रेसमध्ये एक काळ असा होता की शिवसेना आणि भाजपही नव्हती. हे दोन्ही पक्ष नंतरच्या काळात आले होते. स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेसने मोठे योगदान दिले होते. तसे त्यांच्या नेत्यांकडे व्यक्तिमत्व होते. तेव्हा त्यांच्या नेत्यांची नावं घेतली की आदराने मान खाली जायची. पण हल्लीची जी काही पिल्लावळ दिसते त्यांची नावे घेतल्यानंतर शरमेने मान खाली जाते, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्य काळात कॉंग्रेसला कोणीही विरोधक नव्हता. मग सत्तेसाठी लढणारी माणसे निर्माण झाली. स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे हे ते विसरून गेले. म्हणजे निवडणूक ही या देशातील लोकांना पिळण्याची ही एक संधी आहे, वाट्टेल ते करा, पैसा फेका आणि सत्ता मिळवा. सत्तेची हाव निर्माण झाली होती. पण सध्या महाराष्ट्रात मजबूत आणि काम करणारं सरकार देऊ शकते हे महायुतीने गेल्या पाच वर्षात सिद्ध केले आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.