पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही नव्या योजना अथवा तरतूद न करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 593 कोटी 54 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. एकूण 52 कोटी 71 लाख रुपयांचा तुटी अर्थसंकल्प असून, त्यास विद्यापीठाच्या अधिसभेने तत्वत: मान्यता दिली आहे.
विद्यापीठाची शनिवारी ऑनलाइन अधिसभा झाली. त्यात हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार होता. मात्र बहुतांश अधिसभा सदस्यांनी ही अर्थसंकल्पीय अधिसभा प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी केली. त्यानुसार येत्या एक महिन्याच्या आत करोनाच्या स्थिती परिस्थितीचा विचार करून अर्थसंकल्प मांडण्यासाठी अधिसभेची बैठक घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनने स्पष्ट केले. दरम्यान, या अर्थसंकल्पास तत्वत: मान्यता देण्यात आली.
एकूण 593 कोटी 54 लाख रुपयांचा जमा व तितक्याच खर्चाचा विद्यापीठाचा अर्थसंकल्प आहे. गतवर्षी विद्यापीठाचा अर्थसंकल्प 662 कोटी 45 लाखांचा होता. तर 59 कोटी 49 लाखांचा तुटीचा अर्थसंकल्प होता. यंदा मात्र 52 कोटी तुटीचा अर्थसंकल्प आहे. यावर्षी करोनामुळे कोणतेही नवीन तरतूद करण्यात आली नाही. तसेच नव्याने कोणतेही बांधकामाचे काम हाती न घेता खर्चावर मर्यादा घालण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याची माहिती व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिली.
शिष्यवृत्ती रकमेत कोणतीही कपात नाही…
विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या कोणत्याही शिष्यवृत्तीच्या तरतुदीत कपात केली नाही. मात्र संबंधित अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्काइतकी शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आली असून, अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विशेष भर देण्यात येत आहे. तसेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही 9 कोटीची तरतूद कायम आहे, असेही राजेश पांडे यांनी सांगितले.