-->

सेंटर ऑफ एक्‍सलन्सची अद्याप प्रतीक्षा

एनसीएमध्ये खेळाडूंसाठी सुविधाच नाहीत

पुणे –बीसीसीआयने अनेक दशकांपूर्वी थाटामाटात सुरू केलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (एनसीए) आता प्रतीक्षा आहे सेंटर ऑफ एक्‍सलन्सची. बीसीसीआयने काही वर्षांपूर्वीच याबाबत घोषणा केली होती. मात्र, त्याबाबत आता कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. याबाबत बीसीसीआयचा एकही पदाधिकारी अथवा सदस्य बोलण्यास तयार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारतीय क्रिकेटपटूंना झालेल्या दुखापती पाठ सोडायला तयार नसल्याने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाच्या धर्तीवर आता सेंटर ऑफ एक्‍सलन्सची नितांत गरज आहे. मात्र, अद्यापही त्यावर निर्णय होत नसल्याने खेळाडूंनाही दुखापतीतून पूर्ण बाहेर येण्यासाठी सुविधा तसेच संतुलित वैद्यकीय मार्गदर्शन मिळत नसल्याचे चित्र आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळाडूंच्या दुखापतीने संघाला ग्रासले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व रोहित शर्मा दौऱ्यापूर्वीच जखमी झाले होते. ईशांत कसोटीत 25-30 षटके गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त नव्हता. रोहितबाबत तर गोंधळाची परिस्थितीच निर्माण झाली होती. त्याच्या दुखापतीचे मुख्य कारण काय होते ते अद्याप उघड झाले नाही. महंमद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह व लोकेश राहुलही जखमी झाले. संजू सॅमसन, शिखर धवन, दीपक चहर व श्रेयस अय्यर यापासून दूर होते मात्र, तरीही ते पूर्ण तंदुरुस्त होते असेही सांगितले जात नव्हते.

करोनामुळे खेळाडू अनेक महिने सामने तसेच सरावाशिवाय थेट आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी अमिरातीत गेले. त्यानंतर पुन्हा विलगीकरणही झाले व तेथूनच ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या मानसिक तंदुरुस्तीवरही परिणाम झाला होता.

बायोबबलमुळे खेळाडूंना मानसिकदृष्ट्या त्रास झाला आहे. खेळाडूंना हॉटेलमधील खोली बाहेर पडण्यास परवानगी नव्हती. त्यांना खुल्या जिममध्ये व जलतरणासाठी जाण्यास मज्जाव होता. ऑस्ट्रेलियामधील नियम कठोर होते. हॉटेलमध्ये राहिल्याने खेळाडू स्वत:ला तयार करू शकले नाही. या वातावरणामुळे मानसिक तणाव सहन करण्यापलीकडचा होता. खेळाच्या ताणावरील व्यवस्थापन योग्य नाही. त्यातच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) उपयोग रिहॅबसाठी केला जातो.

फिटनेस व्यवस्थापनात भारत पिछाडीवर

भारताचे फिटनेस व्यवस्थापन ऑस्ट्रेलियापेक्षा दोन व इंग्लंडपेक्षा एक दशक मागे आहे. गत फिजिओने व्यवस्थापन प्रस्ताव तयार केला होता, मात्र, ते गेल्यानंतर तो रद्द करण्यात आला. एनसीए एक दशकापासून हाय परफॉर्मन्स तसेच सेंटर ऑफ एक्‍सलन्सच्या प्रतीक्षेत आहे. अद्याप ते तयार झाले नाही. असे सेंटर तयार होणे हे खेळाडूंचा ताण व फिटनेस व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. अन्यथा सातत्याने दुखापतींची ही समस्या कायम राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.