नवी दिल्ली – जगभरात करोना विषाणूमुळे 72 लाखांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झालेला आहे. चार लाखांपेक्षा जास्त लोकांचा यात मृत्यू झाला आहे. मात्र, यातही समाधानकारक बाब म्हणजे जगातील 26 देशांमध्ये सध्या एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. अनेक देशांत आता करोना विषाणू नाहिसा होत आहे. अनेक देशांत मागील काही दिवसांपासून एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. जगभरात 35 लाख 66 हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
सध्या करोना विषाणू संसर्ग झालेले ऍक्टिव्ह रुग्ण 32 लाख 70 हजारांपेक्षा जास्त आहेत. यातील 32 लाख 16 हजार 200 रुग्णांची प्रकृती सुधारत आहे तर, 53 हजार 800 रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या 26 देशांपैकी 18 असे देश आहेत जिथे लोकांना करोना संसर्ग झाला होता मात्र, मृत्यू एकही झालेला नाही.
करोनामुक्त 26 देश
न्यूझिलॅंड, आयले ऑफ मॅन, मोंटेनेग्रो, फॅरोआयलॅंड, त्रिनिदाद अँड टोबॅगो, अरुबा, फ्रेंच पॉलीनेशिया, मकाओ, एरित्री, तिमोर-लेस्टे, न्यू कॅलेडोनिया, लाओस, फिजी, सेंट किटस् अँड नेविस, फाल्कलॅंड आयलॅंड, ग्रीनलॅंड, टर्क्स अँड कायकोज, व्हॅटिकन सिटी, मॉन्टसेराट, सेशेल्स, ब्रिटिश वर्जिन आयलॅंड, पापुआ न्यू गीनी, कॅरीबियन नेदरलॅंड्स, सेंट बार्थ, अंग्विला आणि सेंट या 26 देशांत करोनाचा एकही रुग्ण नाही.
पाच देशांत फक्त 1 करोना रुग्ण
ब्रूनेई, सिंट मारटेन ग्रेनाडा, बेलीज, सेंट लूसिया या पाच देशांत फक्त एकच करोना रुग्ण आहे. हे देशही लवकरच करोनामुक्त होणार आहेत. याशिवाय काही देशांमध्ये दहा पेक्षाही कमी करोना रुग्ण आहेत.