हवेलीत ‘भंगार’मधून लाखोंची उलाढाल

दत्तात्रय गायकवाड

वाघोली – पूर्व हवेली तालुक्‍यातून राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाचे जाळे दिवसेंदिवस वाढले आहे. अनेक इतर मार्गांना जोडणारे मार्ग निर्माण होऊ लागले आहेत. शहराच्या जवळचा भाग असल्यामुळे वाढत्या शहरीकरणाबरोबर इतर व्यवसायही जोमात आहेत. यातच भंगाराच्या मार्केटचे वातावरण सध्या लाखोंच्या उलाढालीने गजबजले आहे. भंगाराच्या मार्केटवर कारवाई करण्याची मागणी सध्या नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

पुणे शहरात येणाऱ्या अनेक मालाच्या बाबतीत पुणे शहराजवळ असणाऱ्या अनेक ठिकाणी काही व्यवसायिकांनी गोदामे उभी केली आहेत. याच गोदामांमध्ये स्क्रॅपचा माल अथवा भंगार स्वरूपात तयार होणाऱ्या मालाची संख्या वाढू लागली आहे. अनेक छोट्या, छोट्या, मोठ्या चोरीचा माल देखील याच भंगाराच्या दुकानांमध्ये सर्रासपणे तुकडे-तुकडे करून विकला जात आहे. सदनिकांमध्ये तसेच अनेक गृहप्रकल्पामध्ये राहणाऱ्या लोकांची चौकशी करणाऱ्या पोलीस यंत्रणेला भंगाराच्या दुकानांमध्ये जमा होणाऱ्या मालाच्या बाबतीत का संशय येत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

पुणे शहरालगत असणाऱ्या या अनेक भागांमध्ये गोदामांची संख्या येथे चार ते पाच वर्षांमध्ये शंभरच्या पुढे गेली आहे. कामगारांच्या दुकानांची संख्या देखील रस्त्याच्या कडेला तसेच लहान-मोठे गोदामांमध्ये वाढली आहे. त्यामुळे भंगारांच्या दुकानांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस यंत्रणेने जर या दुकानांची झाडाझडती केली तर अनेक चोरीच्या गुन्ह्यातील साहित्य या दुकानांमधून मिळू शकते. परंतु त्याचे रूपांतर भंगारमध्ये होण्याऐवजी पुराव्यांमध्ये होण्यापर्यंत पोलिसांचा तपास गरजेचा आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसेच हवेली तालुक्‍यातील सर्व पोलीस ठाणे यांनी याबाबत जर कडक पवित्रा घेतला तर भंगारातील सोने लवकरच उजेडात येऊ शकेल, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

रात्रीच्यावेळी कंटेनरमधून उतरवला जातो माल
सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून स्क्रॅपच्या नावाखाली चांगल्या चांगल्या वस्तूंचे तुकडे करून विक्री करण्याचा धंदा सध्या तेजीत आहे. परिसरात असणाऱ्या गोदामांमध्ये ही साठवणूक जादा प्रमाणात होत आहे. त्यामुळे अशी गोदामे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.

तपासणीची गरज…
हवेलीचे पूर्व भागामध्ये जवळपास 100 हून अधिक दुकाने, गोदामे यामधून भंगाराच्या मालाची अथवा कच्च्या मालाची खरेदी विक्रीचा व्यवसाय चालतो. या व्यवसायाची पोलीस यंत्रणेकडून कसून चौकशी होणे गरजेचे आहे. यातून तो माल कुठून आणला आणि तो कसा आला याची शहानिशा होऊ शकते. काही अनुचित प्रकार घडले असतील अथवा काही चोरीचा मामला असेल तर तोही उजेडात येऊ शकतो.

पूर्व हवेली हद्दीमधील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भागात जर गोदामे वा भंगाराच्या दुकानांमधून काही अनुचित प्रकार घडत असतील तर याबाबत कसून चौकशी करून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. सई भोरे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली

पूर्व हवेली तालुक्‍यातील स्क्रॅपच्या दुकानाची झाडाझडती पोलीस यंत्रणा व इतर विभागांमार्फत होणे गरजेचे आहे. त्यातून अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.
– संदीप सातव, माजी उपसरपंच, वाघोली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)