मागणीपेक्षा पुरवठा कमी : सामाजिक संस्थांची सेंटर्स सुरू करण्यातही अडचण
पुणे – सध्या ऑक्सिजनची गरज असलेल्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यांसोबतच बेडची कमतरता जाणवू लागल्याने विविध ठिकाणी ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ऑक्सिजनचाच पुरवठा कमी होत असताना त्याचे डिस्ट्रिब्युशन करण्याचेही आव्हान प्रशासनासमोर आहे.
शहरात सुमारे 55 हजार करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी साडेपाच हजारांवर ऑक्सिजनवर असून, बाराशेहून अधिक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असताना महापालिकादेखील खासगी, महापालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने स्वत: जिल्हाधिकारी ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवून आहेत. पुण्यात सर्वाधिक रुग्ण शिवाजीनगर सीओईपी जम्बो रुग्णालय, नायडू रुग्णालय, बाणेर कोविड हॉस्पिटल आणि दळवी हॉस्पिटलमध्ये आहेत.
सीओईपीमध्ये दररोज 16 टन ऑक्सिजनची गरज असून, उर्वरित सर्व रुग्णालयांची गरज मिळून 40 टन आहे. यासोबतच शहरातील खासगी रुग्णालये आणि कोविड सेंटरसाठीही ऑक्सिजनची गरज आहे.
जिल्ह्यात सुमारे 380 टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असलेल्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या चाकण परिसरात आहे. तर संपूर्ण जिल्ह्याची फक्त करोनासाठी 300 टनांची डिमांड आहे.
याठिकाणाहून हा ऑक्सिजन पुरवठा होत असून विदर्भ आणि मराठ्यावाड्यातील काही शहरांमध्ये येथूनच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनचा टॅंकर अर्धा एक तास उशिरा आला, तरी मोठ्या रुग्णालयांमध्ये विशेषत: जम्बो रुग्णालयामध्ये रुग्णांऐवजी डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांनाच “टेन्शन’ येत आहे.
पुरवठ्याची शाश्वतीच नाही
महापालिकेने बिबवेवाडी येथील ई.एस.आय. रुग्णालय ताब्यात घेतले आहेत. तेथे 90 बेड ऑक्सिजनचे आहेत. तसेच गणेश कला क्रीडा मंच येथेही 100 ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी आहे. परंतु ऑक्सिजनचाच पुरवठा नसल्याने येथे रुग्ण दाखल करून घेणे कठीण झाले आहे. अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्था त्यांच्या भागामध्ये 20 ते 50 ऑक्सिजन बेडचे क्वारंटाइन सेंटर सुरू करत आहेत. मात्र, ऑक्सिजन पुरवठ्याची शाश्वतीच मिळत नसल्याने त्यांना हे सेंटर्स सुरू करण्यात अडचण येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.