उमेश सुतार
कराड पालिकेचा पुढाकार; शहरात संदेशातून जनजागृती
कराड – “स्वच्छ सर्वेक्षण 2020′ मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्याचा ठाम निश्चय केलेल्या कराड पालिकेने आता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतींवर “आम्ही तयार आहे, तुम्ही तयार आहात ना?, हर दिन दो डसबीन’ अशा आशयाचे संदेश छापले आहेत. त्यामुळे आता शहरातील इमारतींवरील भिंतीही स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी बोलक्या झाल्या आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत शहरात कचऱ्याचे पूर्ण उच्चाटन करण्यात आले आहे. यासाठी पालिकेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कराड अर्बन बॅंकेनेही नगरपालिकेस सोळा हजार कचरा कुंड्यांचे वितरण केले आहे. शहरातील काही सोसायटीतील कुटुंबांनी स्वत:हून घरातील कचरा बाहेर न टाकता घरगुती खत प्रकल्प निर्माण करण्याचा निर्णय घेत तो अंमलात आणला आहे. पालिकेने राबविलेल्या “स्वच्छ कराड, सुंदर कराड’ उपक्रमांतर्गत शहराचे रुपडे दिवसेंदिवस बदलत चालल्याचे दिसून येत आहे.
कराड शहराला निरोगी व सुंदर बनविण्यासाठी येथील नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून चांगले निर्णय घेतले जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात कराडला अव्वल बनविण्यासाठी प्रसंगी साम, दाम, दंड याचाही वापर केला जात आहे. त्या अनुषंगाने पालिकेच्यावतीने तशा उपाययोजना राबविण्यास सुरूवात केली आहे. शहरात कोठेही उघड्यावर कचरा टाकताना कोणी आढळल्यास त्याच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे पालिकेच्या या कारवाईचा धसकाही नागरिकांनी घेतला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या मोठ्या कचरा कुंड्या हटवून तेथे स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. स्वच्छ व सुंदरकराडसाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. म्हणून तर आता शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन परिसर, पत्रकार भवन परिसर, पालिकेच्या मालकीच्या असलेली व्यापारी संकुले, प्राथमिक शाळांच्या इमारती, सार्वजनिक शौचालये, विविध हॉल, सभागृहे, उद्याने, पालिकेच्या शाळा आदी वास्तूंच्या भिंतींवर आता स्वच्छ कराड, सुंदर कराड, ओला कचरा व सुका कचरा वेगळा टाका, स्वच्छता राखा अशी स्वच्छतेचे संदेश देणारी चित्रे व फलक नागरिकांमधून जागृती करत आहेत. निसर्ग देखाव्यासह विविध कल्पनांचा वापर करून रंगविल्या जात असलेल्या भिंती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
लाखो रुपयांची तरतूद
कराड शहरातील पालिकेच्या मिळकती व खासगी मालमत्तेच्या इमारतींच्या भिंतींवर रंगकाम करण्यासाठी लाखो रुपयांची तरतूद पालिकेने केली आहे. या तरतुदीअंतर्गत कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली इमारतींच्या भिंतींवर आकर्षक रंगकाम करुन स्वच्छतेचे संदेश टाकण्यात आले आहेत.
इमारतीच्या सौंदर्यात भर
नगरपालिकेच्यावतीने विविध रंग वापरुन शिवाय आकर्षक संदेश टाकून शहरातील रस्त्याकडेला व दर्शनी भागात असलेल्या इमारतींच्या भिंती रंगविल्या आहेत. त्यामुळे इमारतींना वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. परिणामी शहरात सर्वत्र स्वच्छतेचा संदेश टाकलेल्या भिंतीही स्वच्छतेचा संदेश देत आहेत.
टाकाऊपासून टिकाऊ शिल्पांची निर्मिती
नगरपालिकेने आपले कराड शहर देशात अव्वल ठरवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. पालिकेने अनेक टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तसेच आकर्षक असे प्रतिकात्मक शिल्प तयार केलेली आहेत. यामध्ये प्लॅस्टिक बाटल्याचा वापर करुन मासा, हंस तसेच टायरचा वापर करीत विविध प्रकारच्या फुलदाणी, भला मोठा हत्ती या बनवलेल्या प्रतिकृती सर्वाचेच लक्ष वेधत आहेत. ही शिल्पे चौकाचौकात ठेवल्याने शहराला आगळेवेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे.