शहरातील 741 ठिकाणे ठरली डेंग्यूला निमंत्रण देणारी

पिंपरी – साथींचे आजार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे. मागील 5 महिन्यांत पालिकेने शहरातील इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या ठिकाणची पाहणी केली. यात शहरातील विविध भागातील 741 ठिकाणी मलेरिया, डेंग्यू तसेच दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. या सर्वांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावून दंडही वसूल केला आहे. मात्र, तरीही डासोत्पत्तीची ठिकाणे अद्याप कमी झालेली नाहीत. त्यामुळे, शहरात आणखी डेंग्यूची लागण सुरुच असल्याचे दिसत आहे.

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय धूर फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू असते. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जात आहेत.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी मे महिन्यापासून महापालिकेच्या वतीने डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याचे काम सुरु होते. एप्रिल महिन्यापासून केलेल्या या तपासणी आणि कारवाई मोहिमेत पिंपरी-चिंचवडकरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एप्रिल महिन्यात महापालिकेच्या पथकाने केलेल्या तपासणीमध्ये 76 ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. तर मे महिन्यात 219, जून महिन्यात 223, जुलैमध्ये 91 व ऑगस्ट महिन्यात 132 लोकांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पाच महिन्यांत वरील सर्व 741 लोकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून 4 लाख 18 हजार 860 रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्यानंतरही शहरात अनेक ठिकाणी अद्यापही डासोत्पत्तीची ठिकाणे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, मागील काही दिवसापासून परतीचा पाऊस सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा डेंग्यु, मलेरिया यासारख्या आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी डास उत्पन्न होणार नाहीत, अस्वच्छता पसरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

चिकुनगुनियाचा 1 तर डेंग्यूचे 20 संशयित रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत 183 जणांची डेंग्यूची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर चिकुनगुनियाचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. मागील महिन्यापासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत असल्यामुळे तापीचे रुग्ण वाढले होते. त्यापैकी संशयित रुग्णाची तपासणी करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यातही डेंग्यूचे 40 रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)