शिर्डी -आंतराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी सध्या भाविकांच्या ड्रेसकोडमुळे चर्चेत आहे. साई संस्थानने मंदिर परसरात भाविकांना भारतीय संस्कृतीनुसार पोशाख परिधान करण्याच्या विनंतीचे फलक लावले आहेत. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सदर फलकांवर आक्षेप घेत थेट शिर्डीत येऊन तो फलक काढण्याचा इशारा दिला आहे.
तृप्ती देसाईंना शिर्डीत नो एन्ट्री
यातच आता शिवसेनेच्या महिला संघटक स्वाती परदेसी यांनी तृप्ती देसाई यांना एक इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या ,’तृप्ती देसाई शिर्डीत यायलाच हव्या. त्यांना इथे आल्यावर कळेल की त्यांनी संस्थानावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. त्या इथे आल्या की त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही नक्कीच राहणार नाही. तसंच, दरवेळी मंदिरात जे काही स्टंट त्या करत असतात, त्यांचे ते सगळे स्टंट आम्ही आज बंद करू”, असं म्हणत त्यांनी देसाई याना इशाराच दिला आहे.
दरम्यान, शिर्डी संस्थानने काही भाविकांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड ठेवण्याची विनंती केली होती. त्याची दखल घेत शिर्डी संस्थाने मंदिर परिसरात भाविकांनी भारतीय पोशाखात दर्शनासाठी येण्याचे आवाहन करणारे फलक लावले आहेत. त्याला आक्षेप घेत 10 डिसेंबर रोजी शिर्डीत येवून आपण हे फलक हटविणार, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली. त्यानंतर भाविकांत व शिर्डीतील नागरिकांत संताप निर्माण झाला. त्यामुळे शिर्डीतील अनेक सामाजिक संस्थांनी तृप्ती देसाई यांचा निषेध केला.