सात दिवसांत पाणीपट्टी न भरल्यास नळजोड तोडणार
पिंपरी – महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वेळेत पाणीपट्टी न भरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आठ प्रभाग कार्यालयांना पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी बनविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या सर्वांना आदेशानंतर सात दिवसांच्या आत थकीत कर न भरल्यास त्यांच्याविरुद्ध नळजोड तोडण्याची कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेच्या सर्व विभागांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. थकीत 60 कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीसाठी लवकरच धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. चिखली, मोशी, भोसरी आणि पिंपरी या भागातून सुमारे 10 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी येणे बाकी आहे. “ब’ प्रभागाच्या हद्दीतील चिंचवड, रावेत, काळेवाडी या भागातून 8 कोटी 97 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही सर्व थकबाकी वसुल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग कामाला लागला असून ही वसुली मोहीम कडक करण्यात येणार आहे.