पुणे – शहरातील दुकाने सुरू झाल्यानंतर काही भागांत गर्दी वाढू लागली आहे. ती अशीच वाढत राहिली, तर नाईलाजास्तव दुकानांच्या वेळेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल. गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड एका बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचा पर्याय अवलंबवावा लागेल, असा इशारा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.
पवार म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील करोना बाधित दर कमी झाल्यामुळे मागील आठवड्यापासून शहरातील सर्व दुकाने दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली. मात्र, दुकाने सुरू होताच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढू लागली.
त्यातच दुकानांची वेळ 4 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याबाबत पवार म्हणाले, “शहरातील बाधित दर कमी झाला म्हणजे करोना संपला असे होत नाही. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, करोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.’
“लॉकडाऊनमुळे नागरिक कंटाळले, त्यांची कामे रखडली आहेत. तर अनेकांचे रोजगार गेले. यामुळे टप्प्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. दुकाने सुरू करण्याआधी संबंधित व्यापाऱ्यांशी चर्चा करून, कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याची माहिती देण्यात आली. मात्र, दुकाने सुरू होताच गर्दी वाढू लागली आहे.
ही गर्दी अशीच सुरू राहिली तर पिंपरी चिंचवडप्रमाणे पुणे शहरातही पी-1, पी-2 प्रमाणे एक दिवसाआड दुकाने सुरू करावे लागतील. त्याबाबत संबंधित व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा करण्यात येईल. मात्र, हा निर्णय घेण्याची वेळ येऊ न देण्यासाठी गर्दी टाळण्याची खबरदारी घ्यावी, असे पवार यांनी सांगितले.