पिंपरी – वार मंगळवार, वेळ सकाळी आठ वाजताची, स्थळ लोणावळा रेल्वे स्टेशन, डेक्कन क्वीन ही मुंबईकडे जाणारी गाडी स्टेशनवरून निघाली. गाडी प्लॅटफार्मला असतानाच एका प्रवाशाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे डी-1 या डब्यातील सहप्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या डब्यातील चेन बंद असल्याने सहप्रवाशांनी डी-2 या दुसऱ्या डब्यात जाऊन चेन खेचली. त्यानंतर रेल्वेही स्टेशनपासून बरीच अंतर आली होती. मात्र घाटात त्या प्रवाशाला उपचारासाठी कसे नेणार, असा प्रश्न निर्माण झाला. अखेर रेल्वे खंडाळा स्टेशनवर थांबवून त्यास उपचारासाठी रवाना केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. जर डब्यातील चेन सुरू असती तर कदाचित त्या प्रवाशाचा प्राण वाचला असता, अशी चर्चा रेल्वे प्रवाशांमध्ये सुरू आहे.
डी. एम. जैन (रा. तळेगाव) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते नियमित प्रवास रेल्वे प्रवास करीत होते. मंगळवारी सकाळी आठ वाजता रेल्वे लोकलने ते लोणावळा येथे आले. तेथून त्यांनी मुंबईला जाण्यासाठी डेक्कन क्वीन रेल्वे गाडी पकडली. डेक्कन क्वीन स्टेशनवरून सुटताच जैन यांना ह्रदयविकाराचा झटका आला. गाडी स्टेशनवरच असल्याने सहप्रवाशांनी डी-1 डब्यातील चेन खेचून रेल्वे उभी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या डब्यातील एकही चेन सुरू नव्हती. प्रवाशांनी इतर डब्यात जाऊन चेन ओढली. मात्र तोपर्यंत रेल्वेने वेग घेतल्याने ती बरीच पुढे आली होती.
चेन ओढल्यावर रेल्वेचे कर्मचारी आले. इतर प्रवाशांनी त्यांना हकीगत सांगितली. मात्र आता घाटात उतरवून काहीच उपयोग नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे गाडी खंडाळा स्टेशनवर थांबविण्याचा निर्णय घेतला. डेक्कन क्वीनने प्रवास करणारे काही डॉक्टर तिथे आले. त्यांनी जैन यांना तपासले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर खंडाळा स्टेशनवर जैन यांना उतरविण्यात आले. पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
मुंबई पुणे दरम्यान दररोज धावणारी डेक्कन क्वीन ही प्रतिष्ठेची मानली जाते. बहूतांश चाकरमानी याच रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात. मात्र या प्रतिष्ठेच्या गाडीत चेन सुरू नसणे ही योग्य गोष्ट नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळोवळी रेल्वेची तपासणी करून त्यातील त्रुटी दूर करणे गरजचे आहे, असे मत रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केले.
…आणि पत्नीचा फोन आला.
काही सहप्रवाशांनी याबाबत मयत व्यक्तीच्या घरी कळविण्यासाठी त्याचा फोन घेतला. मात्र मोबाइलला पासवर्ड असल्याने ते शक्य झाले नाही. मात्र थोड्याच वेळात त्याच्या पत्नीचा फोन आला. तुमच्या पतीची प्रकृती बिघडल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच लोणवळा येथील रुग्णालयात येण्यास सांगितले.