…तर सरकारच्या ११ जागा आणि आघाडीच्या २७७ जागा येतील- राष्ट्रवादी काँग्रेस

बल्लारपूर: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शिवस्वराज्य यात्रेतून भाजपवर हल्लाबोल करत आहे. बल्लारपूर येथील सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, “काही दिवसापूर्वी चांद्रयान सफल झाले नाही, यावर पंतप्रधान मोदी रडले. पण मोदी रडले ते केवळ ३७० नंतरचा मुद्दा गेला याकरिता. भिडे गुरुजी सांगतात एकादशीला यान उडवले असता सफल झाले असते. पण सरकार गड-किल्ले भाड्याने देण्याचे जाहीर करत आहेत. यावर काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नाही मात्र रशियाला हजारो कोटींचे कर्ज देण्याची ताकद कशी काय आहे?

पक्षाची निष्ठा सोडली की लोकांना ढोलकी वाजवण्याची वेळ आली आहे. जे पक्षाशी निष्ठावंत आहेत आणि जे संकटाच्या काळात साथ सोडत नाहीत तेच इतिहास घडवतात. जर बॅलटवर निवडणूक घेतली तर या सरकारच्या केवळ ११ जागा येतील. आणि आघाडीचे २७७ जागा येतील यात शंकाच नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा भाजपा-शिवसेना सरकारवर टीका करत विरोधी पक्षांची बाजू उपस्थितांसमोर अतिशय समर्थपणे मांडली.

कोल्हे म्हणाले, “या सरकारची २०१४ सालची सगळी आश्वासनं आठवा. या सरकारने आजपर्यंत जे काही केले त्याचा सर्व लेखाजोखा जनतेपुढे मांडण्याची गरज आहे. ५४ वर्षांचे कर्ज हे २ लाख कोटी आणि या सरकारने पाच वर्षांत पाच लाख कोटी कर्ज करुन ठेवले आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, अशी या सरकारची अवस्था आहे. भाजपा-शिवसेनेचे सरकार महाराष्ट्राचा इतिहास पुसायला निघालं आहे. असल्या लोकांचे अस्तित्व पुसून टाकण्याची जबाबदारी आपली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.