नगर – शहरातील हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र.222 हा सक्कर चौक ते अमरधाम नेप्ती नाका ते कल्याण रोड बायपास पर्यंतचा अत्यंत खराब रस्ता तातडीने दुरुस्त करावा. अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नगरमध्ये आल्यावर काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा शिवराष्ट्र सेनेच्यावतीने अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी दिला आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज औशिकर व पदाधिकारी उपस्थित होते. शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.222 कल्याण रोड बायपास ते सक्कर चौकापर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले आहे. रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. या रस्ता दुरुस्तीच्या प्रश्नाला गांभीर्याने न घेतल्यास येत्या 19 नोव्हेंबरला नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. मंत्री गडकरी यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे.