नाराज एकनाथ खडसेंना अजित पवारांची ऑफर
मुंबई : मागील काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर नाराज आहेत. त्यांच्या नाराजीवर पक्षाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. दरम्यान, आता आजपर्यंतचा एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास लक्षात घेता खडसे यांना जर राजकारणात टिकायचे असेल तर सत्ताधारी महाविकास आघाडीतील एका पक्षात प्रवेश करण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यावर अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकारांच्या सुयोग या निवासस्थानी भेट दिली. तसेच त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
अनेक राज्यातील पक्ष फोडण्याचे काम भाजपकडून झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदार फुटल्यास त्यावर काय उपाययोजना असणार आहेत, असा सवाल अजित पवार यांना करण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ होते. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू शकत नव्हतो. पण अनेक घडामोडीनंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित आले. त्यानंतर महाविकासआघाडी पुढे येऊन सत्ता स्थापन झाली. पण आता यापुढील काळात आपले आमदार फुटू नये. त्याविषयी काळजी घेतली जात आहे.
मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता, आमचा कोणताही आमदार फुटणार नाही,अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, जर एखादा आमदार फुटला आणि पोटनिवडणूक लागली. तर ज्या पक्षाचा आमदार फुटला आहे त्या पक्षाचा उमेदवार द्यायचा आणि तीन ही पक्षांनी एकत्र येऊन जागा निवडून आणायची, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.