…तर करोनाच्या चौथ्या लाटेचा धोका; जर्मनीच्या राजदूतांचा इशारा

नवी दिल्ली – जगभरात अनेक देशांमध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होतो आहे. मात्र भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे. लिंडनर यांनी कोविड-19 ची चौथी लाट येण्याचा इशारा दिला आहे.

अनेक देशांमध्ये कोविड प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या आणि विशेषतः अधिक घातक असलेल्या “डेल्टा’ व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्याच्या आधारे या चौथ्या लाटेची शक्‍यता वर्तवली जात असल्याचे त्यांनी एका ट्विटमध्ये सांगितले.

युरोपातील रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. त्यामुळे काही निर्बंध आता शिथील केले जात आहेत. मात्र त्याचवेळी अधिक संक्रमण क्षमता असलेल्या आणि लसींच्या प्रभावालाही न जुमानणाऱ्या “डेल्टा’ व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांची संख्या अनेक देशांमध्ये वाढताना दिसते आहे.

यामुळेच चौथ्या लाटेची शक्‍यता वाटते आहे. यामुळे आतपर्यंत जे काही यश मिळवले आहे, ता वाया जाण्याचे धोका निर्माण झाला आहे, असे लिंडनर यांनी म्हटले आहे.

ज्या देशांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे, तेथील प्रवासाला परवानगी देणे वाटते तितके सोपे नाही. पुढील लाटेमध्ये आपल्या नागरिकांचे जीव वाचवणे, हे तज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे.

आपण केवळ दृश्‍य परिणाम बघतो आहोत. विद्यार्थी, कामगार यांच्या अडचणी आपण बघतो आहोत. पण विषाणू तज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या नागरिकांचे जीव वाचवायचे आहेत, हे देखील लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जागतिक आरोग्य संघटनेनेही “डेल्टा’ व्हारिएंटला घातक व्हेरिएंट म्हणून संबोधले आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडला होता. मात्र भारतात या व्हेरिएंटचे रुपांतर “डेल्टा प्लस’ किंवा “एवाय. 1′ या व्हेरिएंटमध्ये झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.