वॉशिंग्टन – चीन अथवा अन्य कोणत्याही देशात आमच्या कारचा गैरवापर अथवा हेरगिरीसाठी वापर होणार असेल तर आपण कंपनी बंद करू असे वक्तव्य टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी केले आहे.
चीनमधील सरकारी अधिकारी, लष्करी अधिकारी आणि महत्वाच्या व्यक्तींनी टेस्लाच्या कार्सचा वापर करण्यास त्या देशाच्या सरकारने बंदी घातल्याचे गेल्या आठवड्यात वृत्त होते. या गाड्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चीनमधील माहिती अमेरिकेला पाठवली जात असल्याचा दावा वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत केला होता. त्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे.
टेहळणी अथवा हेरगिरीसारख्या बाबींत आपली कंपनी कधीच सहभागी होणार नाही. कोणत्याही देशाच्या संदर्भातील संवेदनशील माहिती ही गुप्तच राहीली पाहिजे असे आमचे मानणे आहे. त्यामुळे चीनच काय अन्य कोणत्याही देशाच्या विरोधात किंवा अन्य कोणत्याही देशाने कोणाच्या विरोधात टेस्लाच्या कार्सचा हेरगिरीसाठी वापर करण्यास आमचा ठाम विरोध असेल. तशी वेळ आलीच तर आपण कंपनीही बंद करू असे मस्क म्हणाले.