…तर सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री – चंद्रकांत पाटील

इस्लामपूर – सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री जयंत पाटील यांच्या भाषणाचा प्रारंभ, मध्य व शेवट चंद्रकांत पाटीलच आहे. माझा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे भाषण पुर्णच होत नाही, अजितदादा, जयंतराव राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे? काय ठरलं होतं हे जाहिररित्या सांगायला लावू नका. तुम्ही दोघांनी कितीही आदळआपट करा भविष्यात कदाचित राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर सुप्रिया सुळेच होतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजप व महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

गतवर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो नसतो अन् इस्लामपुरात आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती. मग ते राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते असा खोचक टोलाही पाटील यांनी इस्लामपूर येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता लगावला.

काकांबद्दल अजितदादा स्तुती व गोडवे गात आहेत. एवढाच काकांवर जीव असला तर अजितदादांनी गतवर्षी तीन दिवसांसाठी का होईना काकांना सोडले हा इतिहास नाही का? अशी टिकाही त्यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “चंद्रकांत पाटील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. जयंतराव तुमच्या घरात काय चाललयं? तुमच काय स्थान आहे? हे तुम्ही पहा. विषम विचारांचे पक्ष एकत्र येवून वाटून खाऊ अशी आमची वृत्ती नाही. ५ वर्षे सत्ता गेली तर तुमची अवस्था पाण्यातून बाहेर पडलेल्या माश्यासारखी झाली होती आम्हाला अजूनही शांत झोप लागते. काँग्रेस सोनिया गांधी, राष्ट्रवादी शरद पवार, समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव, राष्ट्रीय जनता दल लालू यादव असे घराण्यांचे पक्ष आहेत भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस आमदार, खासदार, मंत्री होतो. भाजपमध्ये सर्वात जास्त महिला, मराठा, ब्राम्हण, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील आमदार आहेत, इतर कोणत्याही पार्टीत आहेत का? हे दाखवून द्या. राष्ट्रवादीचे अरूणअण्णा यांना ७४ व्या वर्षी जिल्ह्यात फिरण्याचा त्रास देणे बरोबर नाही. प्रवास करताना त्यांची दमछाक होईल.”

जयंत पाटलांना पराभूत करायचे असेल तर..

इस्लामपूर मतदार संघातील भाजप व सहयोगी पक्षातील सर्वांनी मने मोठी करावीत. आपआपसातील मतभेद विसरावा लागेल. तुमच्यात कसा वाद होतो मी पाहतो. तुम्ही एकत्र आल्याशिवाय.मतदारसंघात परिवर्तन होणार नाही,असा सल्ला चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.