कवयित्री वर्षा शिदोरे यांच्या या नव्या कवितासंग्राहात स्मिताच्या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा कविता संग्रह म्हणजे आजच्या तरूण पिढीच्या भावना आहेत, सोबतच जीवनाबद्दलच्या नवनव्या विचारांतून कवयित्रीच्या हृदयाला फुटलेला पाझर!
एखादी परिस्थिती अशी येते की तेव्हा आपल्याला “रिऍक्ट’ व्हायचं नसतं, असेही नसते की आपला स्वार्थ लपवायचा असतो पण फक्त “मनमोकळा’ संवाद हवा असतो. पण नकळत “प्रतिक्रिया’च व्यक्त होते व प्रतिसाद राहून जातो तसाच. एक नवयुवक-युवती म्हणून पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा किंवा प्रश्न निर्माण व्हावेत असा आवर्जून प्रयत्न यात कवयित्रीने केला आहे. आपलं हसणं, बोलणं, वागणं, विचार मांडणं या सगळ्याच गोष्टीमागे एक छुपं रहस्य असतं. ते जवळच्या लोकांना जाणवत असतं आणि दुरच्यांपासून लपवण्याचा प्रयत्न असतो. यातूनच “स्मितरहस्य’ हा काव्यसंग्रह साद घालतो.
काही कविता मनातल्या एका ठिणगीची झालेली अग्निज्वाळा आहे तर काही कवितांना विचारांचे पंख हुलकावणी देतात म्हणून कवयित्रीला सुचलेल्या आहेत. वाचकांच्या मनातल्या रहस्यांशी या कविता जुळतात. कवितेचा प्रवास आनंददायी असतो तसेच सततच्या दुःखाचा, जगण्याचा शोधही असतो. हा काव्यसंग्रह जसजसा वाचत जाता तसतसे गंभीर स्वर जीवन, जगणं ह्याच्या सुटसुटीत सोप्या व्याख्या करता येतात. लिखाण एका शब्दाने सुरू होते पण शेवट करताना विचारांचा गाडा सुरूच असतो. या कविता वाचल्यानंतर त्या मनात तरंगत राहतात, दीर्घकाळ…
- शर्मिला जगताप