…तर पावसकरांना स्टेजवरून खाली खेचले असते : उदयनराजे

कराड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुस्लिम समुदायाविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. जर त्या ठिकाणी मी असतो तर पावसकरांना व्यासपीठावरून खाली खेचले असते, असे विधान माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे केले.

माझ्या प्रचारात त्यांना मी कोणताच रोल दिला नव्हता; परंतु सांगता सभेत त्यांनी वादग्रस्त भाष्य करून संपूर्ण कामावर विरजण टाकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पावसकरांच्या त्या वक्‍तव्याबाबत उदयनराजेंनी मुस्लिम समाजाची जाहीर माफी मागितली.

विधानसभा व सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच उदयनराजे यांनी कराडमधील मुस्लिम समाजातील नागरिकांची गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक राजेंद्र यादव, मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते इसाक मुजावर, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, सौ. स्मिता हुलवान, गजेंद्र कांबळे, आदिल मोमीन व नगरसवेक उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, दत्त चौकात झालेल्या सांगता सभेत पावसकर यांनी वाचाळपणा करत मुस्लिम समाजावर टीकाटिप्पणी केली होती. अशी वक्तव्य करणे योग्य नाही. इंद्रधनुष्यतील रंगही सारखे नसतात. तसाच हिंदुस्थानचा ध्वजही आहे. मी विचार करतो की, हिरवा गुलाल काय आहे? मात्र, विचार केला असता, हिरवा रंग म्हणजे निसर्गाचे, पांढरा रंग शांततेचे व भगवा रंग त्यागाचे प्रतीक आहे. मुस्लिमविरोधी वक्तव्ये करणे साफ चुकीचे आहे.

तुम्ही काहीही म्हणा, समजूतदारपणा महत्वाचा असतो. तो पावसकर यांच्याकडे नाही. ते समजूतदार नाहीत. निवडणुकीत तुम्ही जे केले, ते ठीक आहे. मात्र, लक्षात ठेवा पाच वर्षात माझ्याकडे फिरकू नका. पद माझ्यासाठी शून्य आहे. माझ्या लेखी पावसकरांना काहीही किंमत नाही. मी जे करतो ते मनापासून आणि तुमच्यासाठी करतो. पदाची किंमत नाही, पण माणसाची नक्‍की आहे. तुमच्या मनाला विचारा, जे काही बोलले ते मी नाही बोललो. तुम्ही ते मनातून काढून टाका. तुमची माफी मागण्यासाठी येथे आलो आहे. मला तुमच्याबद्दल प्रेम आहे. ते कधीही विसरू शकत नाही, असे सांगत मुस्लिम बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न उदयनराजेंनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)