…तर कुणाचीही हिंमत झाली नसती ; उद्विग्न पंकजा साठी बहीण प्रितमचे वार

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपली असताना बीड जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहे. धनंजय मुंडें यांनी केलेल्या वक्तव्याने परळीतील राजकारण चांगलेच तापले आहे. या व्हायरल क्लिप संदर्भात राष्ट्रवादीचे परळी मतदारसंघातील उमेदवार धनंजय मुंडेंनी खुलासा केला आहे. त्यानंतर, तब्बल 22 तासांनी पंकजा मुंडे माध्यमासमोर आल्या आहेत. परंतु त्यांनी या प्रकरणासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या बहीण खासदार प्रितम मुंडें यांनी मात्र धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरुन निराशा व्यक्त केली आहे.

आम्ही खिन्न झालो आहोत, आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलंय. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात, आता धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही, असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

तसेच जर मुंडे साहेब असते तर, असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असे म्हणत प्रितम मुंडेंनी धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पंकजाताई अनेक दुःखांना आजपर्यंत सामोऱ्या गेल्या आहेत. त्या कधीही खचल्या नाही, काहीही केले तरी त्या खचत नाहीत हीच त्यांची पोटदुखी आहे. एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या असून, आत्तापर्यंत मी त्यांना एवढे उद्विग्न झाल्याचे कधीही पाहिलेलं नाही, असेही प्रितम मुंडें म्हणाल्या आहेत.

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. ”मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे”, असे धनंजय यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.